राज्यातील सर्वात सुंदर नगरपालिका बनवण्यात नागरिकांनी आपले योगदान द्यावे: ना. सामंत

रनप स्थापना दिवस कार्यक्रम रत्नागिरीत उत्साहात

रत्नागिरी:- महाराष्ट्रातील सर्वात सुंदर रत्नागिरी बनविण्यासाठी विकास कामे करणे ही आपली जबाबदारी आहे, आपले कर्तव्य आहे आणि आपण त्यासाठी कटिबध्द आहोत असे प्रतिपादन राज्याचे
उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, मारुती मंदीर येथे रत्नागिरी नगरपालिकेचा 147 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, माजी नगराध्यक्ष मिलींद किर, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वरी शेटये, माजी नगराध्यक्ष राहुल पंडीत तसेच राजन शेटये, माजी उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांच्यासह माजी नगरसेवक व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी नागरिक, कर्मचारी व कर्मचार्‍यांचे कुटुंबिय मोठया संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की रत्नागिरीच्या ईतिहासाची नोंद 13 व्या शतकापासून गॅझेटियरमध्ये आहे. 1 एप्रिल 1976मध्ये रत्नागिरी नगर पालिकेची स्थापना इंग्रजांनी केली. मागील 147 वर्षात रत्नागिरी शहराचा टप्प्याटप्प्याने विकास झाला आहे. रत्नागिरीचा विकास साधताना येथील अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. नगरपालिकेमध्ये अधिकारी कर्मचारी यांचे काम हे कसोटीचे काम असते, म्हणून त्यांचे कौतुक करणे आवश्यक आहे. शारीरीक परिस्थितीवर मात करुन अधिकारी म्हणून उत्कृष्ठ काम करणार्‍या रत्नागिरीचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. नगरपालिकेतील सफाईकामगारांचाही मान सन्मान ठेवला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्वात सुंदर रत्नागिरी बनविण्यासाठी विकास कामे करणे ही आपली जबाबदारी आहे, आपले कर्तव्य आहे आणि आपण त्यासाठी कटिबध्द आहोत असे ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरपालिका स्थापना दिवस साजरा करण्याचा
निर्णय घेतला. यामुळे आपण कुटुंब म्हणून सर्व एकत्र येतो, विचारांची देवाण घेवाण होते, यातून एक चांगली ऊर्जा मिळते. हाच दृष्टीकोण ठेवून हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुढच्या नगरपालिका स्थापना दिनी विकासाची कामे, येथील अधिकारी कर्मचारी यांचे योगदान हे सर्वांसमोर येण्यासाठी कार्यक्रमाचे खुल्या जागेत आयोजन करा असे निर्देश त्यांनी दिले. पुढच्या वर्षीचा 01 एप्रिल हा नगरपालिकेच्या नवीन इमारतीमध्ये साजरा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी नगर पालिकेतील ज्येष्ठ कर्मचारी मकरंद पावसकर, चंद्रकांत सावंत, सिध्दार्थ कांबळे व सौ. स्नेहाली मयेकर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कोरोना काळात स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंतिम संस्कार आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने करणार्‍या जितेंद्र विचारे यांचा खर्‍या अर्थाने गौरव करण्याची विनंती माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांनी केल्यानंतर त्यांच्या मागणील सर्वच माजी नगरसेवकांसह सभागृहातील उपस्थितांनीही टाळ्या व शिट्यांच्या गजरात सहमती दर्शवली. यानंतर त्यांचा पालकमंत्र्यांनी विशेष गौरव केला. यावेळी माजी नगरसेवकांनी आपले विचार व्यक्त केले. या सोहळ्यापूर्वी नगर परिषद कर्मचारी व शाळांमधील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले याला उपस्थितांनी उत्स्फुर्त दाद दिली.