राज्यस्तरीय ज्यु. तायक्वाँदो स्पर्धेत पुणे जिल्ह्याने पटकावली जनरल चॅम्पियनशीप

रत्नागिरी:- 33 व्या ज्युनियर राज्य अजिंक्यपद तायक्वाँदो स्पर्धेत सांघिक विजेतेपद पुणे जिल्ह्याने तर पुमसेमध्ये ठाणे जिल्ह्याने मिळवले. रत्नागिरी तालुका युवासेना व जिल्हा तायक्वाँदो असोसिएशनतर्फे आयोजित या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंनीही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत कौतुकास्पद कामगिरी बजावली.

राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, उद्योजक आणि सिंधुरत्नचे सदस्य किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे तुषार साळवी व त्यांच्या सहकार्‍यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यात मोलाची कामगिरी बजावली. तीन दिवस ही स्पर्धा रत्नागिरीच्या जिल्हा क्रीडा संकुलात सुरु होती. यामध्ये पाचशेहून अधिक खेळाडू, पंच, राज्य संघटनेचे पदाधिकारी याठिकाणी सहभागी झाले होते.
मुलांमध्ये व मुलींमध्ये प्रत्येकी दहा गटात ही स्पर्धा पार पडली. या संपूर्ण स्पर्धेत तायक्वाँदोमध्ये पुणे गटाने निर्विवाद वर्चस्व गाजवत यामध्ये सांघिक विजेतेपद मिळवले तर पुमसेमध्ये ठाणे सांघिक विजेतेपदाची बाजी मारली.

तायक्वांदोमध्ये जुनिअर गटात सांघिक द्वितीय क्रमांक कोल्हापूर जिल्ह्याने तर सांघिक तृतीय क्रमांक रत्नागिरी जिल्ह्याने पटकावला तर पुमसेमध्ये ठाण्यापाठोपाठ द्वितीय क्रमांक पालघर जिल्ह्याने तर तृतीय क्रमांक मुंबई उपनगरने पटकावला या स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशीपवर पुणे जिल्ह्याने नाव कोरले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा तायक्वॉदो असोसिएशन, तालुका तायक्वाँदो असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी युवा सेनेच्या सोबतीने विशेष मेहनत घेतली.