राजापूर येथे उत्पादन शुल्कच्या कारवाईत हस्तक्षेप; दारू माफियांकडून गोळीबार

राजापूर:- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथे मुंबई-गोवा महामार्गावर सापळा रचून दारू वाहतूक करणारा ट्रक पकडला. या घटनेनंतर मागून दोन चारचाकी वाहनातून आलेल्या आठ जणांच्या टोळक्याने पोलिसांना कारवाई करण्यास अटकाव करत गोळीबार करून दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला घेवून पलायन केल्याची थरारक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली.

या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चालक व गोळीबार करणारे सोलापूर येथील असल्याची माहिती समोर आली असून संबंधित चालक व त्याचे दोन साथीदार याला बांदा चेकपोस्ट येथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तशी माहिती राजापूर पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक सतिश इंगले यांनी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबई येथील भरारी पथकाने मुंबई- गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथे अवैधरित्या होणारी दारूवाहतूक रोखण्यासाठी सापळा लावला होता. मंगळवारी मध्यरात्री 1.40 वाजण्याच्या सुमारास संशयित वाहन (क्र. एम. एच. 46. ए. एफ. 6183) समोरून येताना दिसल्याने पोलिसांनी सदरचे वाहन थांबविले. यावेळी वाहन चालक महावीर भोसले व त्याच्यासोबत ज्ञानेश्वर उन्हाळे (रा. पोखरापूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) या दोघांची पोलिसांनी चौकशी केली असता गोव्यावरून अवैध मद्यसाठ सोलापूरला घेवून जाणार असल्याची कबुली त्यांनी पोलिसाना चौकशी केली असता गोव्यावरून अवैध मद्यसाठा भरून सोलापूरला घेवून जाणार असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली.

दरम्यान या वाहनाची चौकशी सुरू असताना 10 मिनिटानंतर गोव्याकडून अचानकपणे स्विफ्ट (क्र. एम. एच. 14. जे. ए.4155) व फॉर्म्युनर (क्र. एम.एच. 9090 ) अशा दोन गाड्या त्या ठिकाणी येवून थांबल्या. या गाड्यांमधून 8 जणांचे टोळके खाली उतरले. यापैकी एक इसम हा सोमनाथ उर्प प्रशांत उर्प बापू तुकाराम भोसले (रा. खवणी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) तर दुसरा त्याचा चुलत भाऊ शेखर भोसले हा होता. बापू भोसले व त्याच्या साथीदारांवर या आधी राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये 10 पेक्षा जास्त गुन्हे नोंद असल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

बापू भोसले याने पोलिसांना माझी गाडी सोडा, तुमच्या विभागाने आतापर्यंत माझ्या भरपूर गाड्या पकडल्या असून माझ्या मद्य व्यवसायाचे खूप नुकसान केलेले आहे. ही गाडी कुठल्याही परिस्थितीत जाऊ देणार नाही, असे धमकावत पोलिसांच्या अंगावर जावून त्याच्या कमरेला असणारी पिस्तुल काढून आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यानंतर पिस्तुलमधून एक राउंड हवेत फायर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने न ऐकता पुन्हा दुसरा राउंड हवेत फायर केला. त्यानंतर त्याने पोलिसांनी चौकशीसाठी थांबविलेल्या वाहन चालकाला व त्याच्या साथीदाराला आपल्या स्विफ्ट गाडीमध्ये बसविले.

दरम्यानच्या कालावधीमध्ये भरारी पथकाने मदतकार्यासाठी बोलविलेले राज्य उत्पादन शुल्क लांजा विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांची दुसरी गाडी येताना पाहून बापू भोसले व त्याच्या साथीदारांनी दोन्ही चारचाकी गाड्यातून पलायन केले. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजापूर पोलिस स्थानकाशी संपर्क साधून माहिती देत कुमक पाठविण्यास सांगितले. त्यानंतर राजापूर पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान फरार आरोपींपैकी दारू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक व त्याचा साथीदार याला पहाटे 3.40 वाजता बांदा चेकपोस्ट येथे कर्तव्यावर असणारे दुय्यम निरीक्षक प्रदिप रासकर यांनी ताब्यात घेतले आहे. तर अन्य आरोपी फरार झाले आहेत.

दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडलेल्या मुद्देमाल ताब्यात घेतला असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर अवैध दारूची वाहतूक रोखत असताना सोमनाथ उर्प प्रशांत उर्प बापू तुकाराम भोसले याने त्याचे ताब्यातील पिस्तुल बाहेर काढून आत्महत्या करण्याची धमकी देवून तसेच हवेत गोळीबार करून दहशत माजविण्याचा प्रयत्न करून व त्याच्यासोबत असणाऱ्या इतर 10 लोकांच्या मदतीने शासकीय कामात अडथळा आणून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात असणाऱ्या वाहन चालक महावीर भोसले व त्याचेसोबत असलेला ज्ञानेश्वर उन्हाळे यांच्या कायदेशीर अटकेला प्रतिकार करून त्यांची अवैधपणे सुटका करवून पळून नेल्याने बापू भोसले, शेखर भोसले व त्यांचेसोबत असणाऱ्या अन्य साथिदारांविरोधात राजापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तशी माहिती पोलिसानी दिली आहे.