राजापूर:- लोकसहभाग आणि जिल्हा नियोजनमधून उपलब्ध झालेल्या निधीतून शहरातून वाहणाऱ्या अर्जुना-कोदवली नद्यांमधील गाळाचा उपसा झाला आहे. गाळ उपशानंतरही पूरस्थिती ओढवल्यास लोकांच्या सुरक्षितेच्यादृष्टीने खबरदारी म्हणून नगर पालिका प्रशासनाने पूररेषेमध्ये वास्तव्यास असलेले आणि संभाव्य पुराचा धोका असलेल्या सुमारे तीनशेहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.
पावसाळ्यातील अतिवृष्टीमध्ये अर्जुना-कोदवली नद्यांना येणाऱ्या पुराच्या पाण्याचा शहराला सातत्याने वेढा पडून शहरातील जनजीवन विस्कळित होत असते. दरवर्षीच्या या स्थितीमध्ये अद्यापही बदल झालेला नाही. पूरस्थितीच्या या समस्येवर मात करण्यासाठी यावर्षी नाम फाऊंडेशनचा पुढाकार आणि लोकसहभागातून नद्यांमधील गाळाचा उपसा केला आहे. त्याला जिल्हा नियोजनमधून उपलब्ध झालेल्या निधीचीही जोड मिळाली आहे. गाळ उपशामुळे नदीचे पात्र रुंदावले असून पात्राची खोलीही वाढली आहे. यानंतर यावर्षी नद्यांना पूर येणार का ? पूर आल्यास त्याची तीव्रता किती राहणार ? याची सार्यांना उत्सुकता लागून राहीलेली आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेवून खबरदारी म्हणून प्रशासनाकडून पूररेषेमध्ये वास्तव्यास असलेल्या आणि संभाव्य पूरस्थितीचा धोका असलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.