राजापूर तालुक्यातील अणसुरे येथील युवकाचा अपघाती मृत्यू; परिसरावर शोककळा

राजापूर:- राजापूर तालुक्यातील अणसुरे आडीवाडी येथील दिनेश भिकाजी गावकर (32) हा देवगड पडेल रस्त्यावरील पुरळ कोंडोमा तिठा नजीक मोटारसायकल ला झालेल्या अपघात मृत्युमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या अपघाताचे वृत्त समजताच अणसुरे परिसरातून जवळपास 40 ते 50 युवकांनी देवगडकडे धाव घेतली.

 दिनेश आपल्या कामासाठी मोटरसायकल ने देवगडला गेलेला होता. 20 ऑक्टोंबर सायंकाळी सातच्या सुमारास सुमो गाडीने ठोकरल्याने त्याचा अपघाती मृत्यु झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी आणि पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

 सुमोची धडक इतकी जोरदार होती की जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. अणसुरे येथील ग्रामस्थांनी आणि विजयदुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमो ने जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला असून सुमो चालक स्वतःहून पोलीस स्टेशनला दाखल झाला होता. सुमो चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे अधिक तपास विजयदुर्ग पोलीस करत आहेत.

देवगड येथे शवविच्छेदन केल्यानंतर दिनेश याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आज सकाळी दहाच्या सुमारास आडीवाडी येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिनेश मिठगवाणे स्टॉप येथे गॅरेज चालवत होता. एक उत्तम मेकॅनिक व मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून तो सुपरिचित होता.

 ऐन दिवाळीच्या तोंडावर दिनेशच्या आकस्मिक अपघाती मृत्यूमुळे अणसुरेसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे ,आई- वडील ,भाऊ विवाहित बहीण असा परिवार आहे.

दिनेश यांच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळताच त्याचे मुंबईतील अनेक मित्रपरिवाराने ही गावी धाव घेतली.संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.