राजापुरात दिवसात दुसऱ्यांदा कंटेनर पलटी; मोठा अनर्थ टळला

राजापूर:-शुक्रवारी राजापूर मध्ये अपघातांची मालिकांचं सुरू आहे. कोदवली येथे अपघातात एक वृध्द ठार झाल्याची घटना सकाळी घडली आणि सायंकाळी पुन्हा एकदा राजापूरातील नेरके येथे एका अवघड वळणावर उत्तराखंडमधून गोव्याला केबल घेऊन जाणाऱ्या कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. ब्रेक निकामी झाल्याने कंटेनर पलटी झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, कंटेनर चालक हुसेन मुबारक हा आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन गोव्याच्या दिशेने जात होता. नेरके येथे आल्यावर ब्रेक लागत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. याच ठिकाणी पती-पत्नी आपल्या छोट्या मुलाला पाणी पिण्यासाठी स्कुटी शेजारी थांबले होते. कंटेनर आपल्या दिशेने झुकताना त्यांनी पाहिले. त्याबरोबर त्यांनी आपल्या पत्नीच्या हाताला धरून आणि मुलाला घेऊन धूम ठोकली. सुदैवाने ते थोडक्यात बचावले. अन्यथा मोठा अपघात होवून अनर्थ झाला असता. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असच म्हणाव लागेल.

या अपघातात बाईक कंटेनरखाली अडकली. बाईकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.