राजापुरात तुळसुंदेत बिबट्या शिरला घरात; परिसरात एकच खळबळ

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील तुळसुंदे परिसरातील एका घरात थेट बिबट्या शिरला. घरातच बिबट्या दबा धरून बसल्यानं नागरिकांमध्ये दहशतीच वातावरण आहे. राजापूर तालुक्यातील अनेक भागात बिबट्याची दहशत पाहायला मिळते मात्र वन विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.

राजापूर तालुक्यामध्ये काही  भागातील शेती असलेल्या परिसरात बिबट्याचा वावर यापूर्वी देखील होता. परंतु आता बिबट्या थेट वाडी – वस्तीमध्ये शिरकाव करून हल्ले करत असल्याचे प्रकार वाढू लागलेत. राजापूर तालुक्यातील कुवेशी येथील तुळसुंदे वाडीत गुरुवारी 14 रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास जुबेदा अन्वर खान यांच्या घरात अंदाजे 4 ते 5 महिन्याचा बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. हा बिबटा जुबेदा खान यांच्या घरात शिरला आणि जुबेदा खान यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असताना त्या ठिकाणी काशीनाथ जाधव आले. त्यानी आरडाओरडा केला. यावेळी बिबट्याला पळवून लावत असताना बिबट्याने जुबेदा खान यांना सोडून काशिनाथ जाधव यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात काशिनाथ जाधव यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. या बिबट्या सोबत मादी असण्याची शक्यता आहे. बिबट्याच्या वावरण्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या शिरल्याची माहिती समजताच परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी बिबट्याला पळवून लावले. 

यापूर्वी असा प्रकार या विभागात सहा महिन्या पूर्वी बलवंत शिर्के यांचा बैल जंगल भागात चरण्याकरिता घेऊन गेले असता बिबट्याने हल्ला करून मारला होता. त्यानंतर आठ दिवसात प्रभाकर लिंगायत यांची गाय वर बिबट्याने हल्ला चढविला होता. या घटनांची लेखी तक्रार वनविभागाकडे करून देखील वनविभागाचे अधिकारी बिबट्याला पकडण्यासाठी कॅमरे, पिंजरे का लावू शकत नाही? लोकांच्या जीवाशी अधिकारी का खेळत आहेत? असे संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

यापूर्वी अनेक वेळा कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पडला आहे. कुवेशी गावातील अनेक शेतकरी हे आंबा व काजू बागायतदार, नागली व भात शेती अशी अनेक प्रकारची शेती करत असून शेतकरी एक-एकटे शेतात ये-जा करत असतात. तसेच काही शेतकरी गुरे व शेळ्या मेंढ्या चरण्याकरिता घेऊन जात असतात. मात्र आता बिबट्या थेट वस्तीत येऊन हल्ला करत असल्याने कुवेशी गावातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बिबट्याला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू करून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.