राजापुरात आंदोलक आक्रमक; रिफायनरीच्या सर्व्हेसाठी आणलेल्या सामानाची जाळपोळ

राजापूर:- तालुक्यातील ग्रीन रिफायनरी संबंधातील बेकायदेशीर सर्वेक्षणा विरोधात पुकारलेल्या आंदाेलनास गुरुवारी हिंसक वळण लागले. ग्रामस्थांनी  रिफायनरीच्या सर्व्हेसाठी अधिका-यांनी आणलेल्या वस्तूंची जाळपोळ केली. ज्या वाहनातून हे साहित्य आणले हाेते. त्यातील काही लाकडी सामान वाहनाच्या बाहेर काढून माळरानावर पेटवून दिले. दरम्यान आंदाेलकांपैकी काही ग्रामस्थांनी ही तर सुरवात आहे. आगामी काळात एकेकास पेटवून देऊ असा इशारा दिला. 

दरम्यान रिफायनरी सर्वेक्षणाचे काम थांबवण्यात येईल असे आश्‍वासन प्रशासनाच्यावतीने आज (गुरुवार) दुपारी साडे तीन वाजता रिफायनरी विरोधी समितीस दिल्याने तब्बल २४ तासांनतर आंदोलकांनी ठिय्या आंदाेलन मागे घेतल्याचे समितीचे अध्यक्ष अमाेल बाेले यांनी सांगितले.

रिफायनरी संबंधातील बेकायदेशीर सर्वेक्षणा विरोधात ग्रामस्थांनी रात्रभर जागरण आंदोलन सुरु ठेवले. या आंदाेलनात देवाचे गोठणे , गोवळ, शिवणे सोलगाव इथले ग्रामस्थ रात्रभर माळ रानावर ठिय्या मांडून हाेते. गेली २० दिवस ड्रोन सर्व्हे , भू सर्वेक्षण बेकायदेशररित्या सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप आहे. जोपर्यंत बेकायदेशीर सर्वेक्षण करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन चालूच राहणार असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या ड्रोन सर्व्हेक्षणाला गोवळ पाठोपाठ शिवणे येथील ग्रामस्थांनीही तीव्र विरोध केला. त्यासाठी शिवणेवासियांनी सुमारे चोवीस तास माळरानावर ठिय्या मांडला होता. प्रांताधिकारी वैशाली माने यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून ग्रामस्थांना विश्‍वासात घेतल्याशिवाय प्रशासन कोणतेही काम करणार नसल्याचे आश्‍वासित केल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतल्याची माहिती बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांनी दिली.      

तालुक्यातील धोपेश्‍वर-बारसू परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्पातील उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून देण्याचे राज्य शासनाने केंद्र शासनाला आश्‍वासित केले आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहारही राज्य शासनाने केंद्र शासनाला केला आहे. त्यातून. धोपेश्‍वर-बारसू परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्पाची उभारणी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून या परिसरामध्ये ड्रोनद्वारे जमिनीचे सर्व्हेक्षण केले जात आहे. या सर्व्हेक्षणाला दोन दिवसांपूर्वी गोवळ येथील ग्रामस्थांनी आक्षेप घेत विरोध केला होता. त्यानंतर, शिवणे येथे सर्व्हेक्षण सुरू झाले. त्यालाही तेथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध करीत रोखून धरले.

रिफायनरीला आमचा विरोध असून त्याअनुषंगाने होत असलेल्या या सर्व्हेक्षणाला विरोध असल्याची भूमिका मांडत शिवणेवासियांनी कालपासून हे सर्व्हेक्षण रोखून धरले होते. या सर्व्हेक्षणासंबंधित सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी माळरानावर ग्रामस्थांनी कालपासून ठिय्या मांडला होता. ग्रामस्थांचे हे आंदोलन आज दुसर्‍या दिवशी कायम राहीले होते. त्याची प्रशासनाकडून दखल घेतली जाताना आज प्रांताधिकारी श्रीमती माने, तहसिलदार शितल जाधव यांनी आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्षस्थळी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत डीवायएसपी निवास साळोखे, पोलिस निरिक्षक जनार्दन परबकर हेही उपस्थित होते. रिफायनरी आणि केमिकल प्रकल्पाला आमचा विरोध असून पर्यावरणपूरक प्रकल्पाला आमचा पाठिंबा असल्याची भूमिका आम्ही ग्रामस्थांनी प्रांताधिकार्‍यांकडे मांडली. यावेळी त्यांनी चर्चा केल्यानंतर यापुढे ग्रामस्थांना विश्‍वासात घेतल्याशिवाय प्रशासनाकडून कोणतेही काम केले जाणार नसल्याचे आश्‍वासित केले.