राजापुरातील पूररेषेबाबत जलसंपदा विभाग ठाम

आयआयटीकडुन दुसऱ्यांदा सर्व्हेक्षण 

प्रणील पाटील/ रत्नागिरी:- जलसंपदा विभागाने निश्चित केलेल्या राजापुरातील पूररेषेबाबत स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. या लाल आणि निळ्या  पूररेषेमुळे निम्मे शहर स्थलांतरित करावे लागण्याचा धोका आहे. स्थानिकांनी थेट न्यायालयात याबाबत दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु जलसंपदा विभागाने पुर्नसर्वेक्षण करून पूररेषा निश्चित केली आहे. त्यामध्येही तांत्रिक त्रुटी राहु नये, यासाठी मुंबईच्या आयआयटी संस्थेकडुनही फेरतपासणी करून घेण्यात आली. या संस्थेने देखील निश्चित केलेल्या पुररेषेवर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे पूररेषेमध्ये बदल होण्याची शक्यता धुसर झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.

शासनाच्या आदेशाप्रमाणे राजापूर शहरातील पुररेषेचे पुर्नसर्वेक्षण करून जलसंपदा विभागाकडून नव्याने निश्चित करण्यात आली. ही पूररेषा शहरवासीयांच्या मुळावर येणार आहे. गाळाने भरलेल्या अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पुराच्या पाण्याच्या पातळीचा आधार घेऊन या विभागाकडून निश्चित करण्यात आलेल्या या पूररेषेमुळे निम्म्या राजापूर शहरवासीयांना स्थलांतरित व्हावे लागण्याचा धोका आहे. पुर्ननिरीक्षण करून निश्चित करण्यात आलेली राजापूर शहराची पूररेषा ही चुकीची आणि जाचक आहे. अशा पध्दतीने तिची अंमलबजावणी केल्यास भविष्यात कोणालाही बांधकाम करता येणार नाही आणि पालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार नाही. त्यामुळे या विरोधात दाद मागावीच लागणार असून प्रारंभी जलसंपदा विभागाकडे ही पुररेषा चुकीचे असल्याचे निदर्शनास आणून देत ती रद्द करून फेरसर्वेक्षणाची मागणी करू. तेथे न्याय मिळाला नाही तर न्यायालयातही दाद मागण्यात येईल अशी घोषणा माजी आमदार अ‍ॅड. हुस्नबानू  खलिफे व माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी केली आहे. जलपसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी राजापूर पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांची नुकतीच भेट घेऊन त्यांनी तयार केलेल्या पुर्ननिरीक्षित पुररेषेबाबत माहिती दिली.

जलसंपदा विभागाने १०० वर्षांमध्ये आलेल्या सर्वांत मोठ्या पूराचा अंदाज घेऊन रेड पूररेषा तर २५ वर्षात आलेल्या सर्वात मोठ्या पुराचा अंदाजावर निळी रेषा निश्चित केली आहे. या पूररेषेमुळे निम्मे राजापूर स्थलांतरित होण्याची भिती आहे. तर लाल आणि निळ्या रेषेमध्येही बांधकाम करताना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे.

सर्व्हेक्षणाचे क्रॉस चेकिंग

स्थानिकांच्या म्हणण्याचा विचार करून जलसंपदा विभागानेही फेरसर्व्हेक्षण करूनच पूररेषा निश्चित केली होती. ती देखील पूर्वीच्या ठिकाणीच आली. अखेर जलसंपदा विभागाने सर्व्हेक्षणाचे क्रॉस चेकिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुंबईच्या आयआयटी संस्थेला हे काम दिले. त्यांनी याची फेर तपासणी केल्यानंतर जलसंपदा विभागाने केलेले पूररेषेचे सर्वेक्षण योग्य असून त्यावर शिक्कामोर्तब केला आहे. पूररेषेच्या निश्चितीबाबत तांत्रिकदृष्ट्या जलसंपदा विभागाने आपली बाजू अधिक भक्कम केली आहे.