राजापुरमध्ये बंदुकीची गोळी लागून आणखी एकजण गंभीर जखमी; तिघांविरोधात गुन्हा दाखल

राजापूर:- शिकारीसाठी गेलेल्या एकाचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच वाटूळ येथे एकजण बंदुकीची गोळी लागून गंभीर जखमी झाला आहे. बंदुकीत अडकलेले काडतूस काढताना गोळी सुटल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. पांडूरंग भूर्के असे या जखमीचे नाव असून 23 जानेवारी रोजी ही घटना घडली.

या प्रकरणी राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओणी येथील शौकत महंमद हाजू यांच्या बंदुकीत काडतूस अडकल्याने ती काढण्यासाठी त्यांचा चालक जगदीश वळंजू याने वाटूळ येथील पांडूरंग भूर्के यांच्याकडे आणून दिली. 23 जानेवारी रोजी भूर्के हे वाटूळ स्मशानभूमीलगतच्या जंगलात एका झाडाखाली बंदुकीत अडकलेले काडतूस काढत असताना बंदुक हातातून निसटून खाली पडली. यामध्ये बंदुकीतून दोन काडतूस फायर होऊन त्या भूर्के यांच्या डाव्या दंडातून आरपार झाल्या.

या घटनेत भूर्के गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीसांनी शौकत हाजू, जगदीश वळंजू आणि पांडूरंग भुर्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुरूवारपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे करत आहेत.