राजस्थानमधील अपहरण झालेली मुलगी सापडली रत्नागिरीत

रत्नागिरी:- राजस्थानमधून अपहरण करून रत्नागिरीत आणलेल्या अल्पवयीन मुलीसह अपहरण करणाऱ्या अल्पवयीन मुलाला रत्नागिरी पोलिसांनी पकडून राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलाने, परिसरातील एका १५ वर्षीय मुलीसोबत पलायन केले होते. या प्रकरणी राजस्थानातील गढी पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. १७ वर्षीय मुलगा व १५ वर्षीय मुलगी रत्नागिरीमध्ये असल्याची माहिती गढी पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे हेड कॉन्स्टेबल लोकेंदर सिंह व कर्मचारी रत्नागिरीत दाखल झाले होते. रत्नागिरी शहर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक साळुंखे व त्यांच्या पथकाच्या मदतीने या अल्पवयीन दोन्ही मुलांचा शोध घेण्यात आला. या संदर्भात मिळालेल्या माहिती आधारे दोघेही सडामिऱ्या परिसरात वास्तव्याला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शोध घेऊन दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. रत्नागिरी शहर पोलिसांनी या अल्पवयीन मुलांना राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन केले.