राजन साळवींच्या वाय प्लस सुरक्षेने रत्नागिरीत चर्चेला उधाण

रत्नागिरी:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते राजन साळवी यांची अचानक सुरक्षा वाढविण्यात आली आहे. जिल्हा नियोजनच्या बैठकीला या सुरक्षा व्यवस्थेसह ते दाखल झाले. त्यामुळे राजन साळवी पुन्हा एकदा राजकीय चर्चेत आले आहेत. त्यांना एस्कॉर्टसह वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सुरक्षा वाढविल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र साळवी यांनी आपली बाजू मांडत आपण बाळासाहेब उद्धव ठाकरे शिवसेनेचे निष्ठावंत
आहोत. मला अडचणीत आणण्यासाठी हे षडयंत्र केल्याचे स्पष्ट केले.

राजापूर मतदारसंघाचे आमदार आणि ठाकरे शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. मात्र जेव्हा सनेते उभी फुट पडली तेव्हा एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असलेल्या जिल्ह्यातील आमदारांमध्ये त्यांचे नाव असल्याचे बोलले जात होते. सोशल मीडियावर तशा बातम्या व्हयरल झाल्या होत्या. त्यामुळे साळवी काहीसे अस्वस्थ होते. अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आपण बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक आहोत. आमच्या रक्तात शिवसेना आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आपण ठाकरे सेनेतच राहणार, असे स्पष्ट करून या विषयावर पडदा पाटला होता. नाणार रिफायनरीलाही राजन साळवी यांनी समर्थन दर्शविले आहे. त्यामुळे त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. काही दिवासंपूर्वी या सुरक्षेतील एस्कॉर्ट काढून घेण्यात आला होता. यासंदर्भात राजन साळवी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याचे समजते.
दोन दिवसांपूर्वीच झालेल्या जिल्हा नियोजनच्या बैठकीत राजन साळवी यांना पुन्हा एस्कॉर्टसह वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली. या सुरक्षा व्यवस्थेसह ते बैठकीला दाखल झाले. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी हे नाराज असल्याचे बोलले जात होते. लवकरच शिंदे गटात दाखल होतील, अशी चर्चा असताना त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाय प्लस सुरक्षा पुरविल्याने चर्चेला अजून उधाण आले. मात्र राजन साळवी आपली बाजू मांडताना म्हणाले, आपण बाळासाहेब उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे निष्ठावंत आहोत. आम्हाला कोणीही निष्ठा शिकविण्याची गरज नाहीं, मी सेनेशी एकनिष्ठ होतो आणि आहे, अशी प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्याबाबत भाजपकडून षडयंत्र रचल्याचा आरोप यावेळी केला.