राजन साळवींचा शिंदे सेनेत प्रवेश कठीण: आ. किरण सामंत

रत्नागिरी:- राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर माजी आमदार राजन साळवी यांनी स्वकियांवरच आरोप करत भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले. परंतु आज, उद्या करत हा प्रवेश लांबला आणि प्रभारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अशी चर्चाच नसल्याचे स्पष्ट करीत प्रवेशाला पुर्णविराम दिला. आता राजन साळवी शिवसेनेत (शिंदे) जाण्याची चर्चा काही दिवस सुरू आहे. परंतु राजन साळवींना पटकन पक्षात घेतील असं मला वाटत नाही, असे आमदार किरण सामंत यांनी स्पष्ट केले. तर मला याबाबत माहिती नाही, असे उदय सामंत म्हणाले. त्यामुळे सामंत बंधुंनी साळवींच्या प्रवेशाची हवाच काढुन टाकली.

माजी आमदार राजन साळवी यांच्या उबाठा शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यासाठी ते मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आठ दिवस ठाण मांडुन होते. परंतु फडणवीस यांची भेट झाली नाही. त्यानंतर भाजपचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हण यांना साळवींच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता त्यांनी देखील याबाबत आपल्यापर्यंत काहीच विषय आला नसल्याचे सांगितले. त्यामुळे साळवी यांचा भाजप प्रवेश रखडला. आता काही दिवसांपासून राजन साळवी एकनाथ शिंदेंच्या शिवसेने प्रवेश करणार असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली. दोन दिवसात ठाणे किंवा 15 तारखेला रत्नागिरीत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतीत साळवींचा प्रवेश होणार असल्याचे बोलले जात होते. याबाबत मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, राजन साळवी यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत आपल्याला काही माहित नाही. त्यानंतर आमदार किरण सामंत यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, वैयक्तिक कामधंदासाठी आणि पदासाठी राजन साळवी यांची धडपड सुरू आहे. त्यांच्यासोबत आता कोणीही शिल्लक राहिलेले नाही. राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते आणि आहेत हे मी यापूर्वी सांगितले होते.

पण राजन साळवी यांना एकनाथ शिंदे पटकन पक्षात घेतील असं मला वाटत नाही. विधानपरिषद आणि महामंडळ देतील असं देखील मला तरी वाटत नाही. राजेश बेंडल सारखे उमेदवार आमच्या पक्षात आहेत. ते खूप थोड्या मतांनी गुहागरमधून पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांना ताकद दिल्यास त्याचा फायदा होईल. एकनाथ शिंदे हुशार आणि धूर्त आहेत. ते योग्य वेळ योग्य निर्णय घेतील याची मला पूर्ण कल्पना.

इतर पक्षांची दार बंद झाल्यामुळे ही अफवा

राजन साळवी यांचा पक्षप्रवेश ही अफवा आहे. याबाबत निर्णय घेताना ते मला किंवा उदय सामंत यांना विश्वासात घेतील. याबाबत त्यांची आणि आमची कोणतीही चर्चा झालेली नाही.
निवडणूक हरल्यापासून राजन साळवी यांच्याबाबतीत पक्षांतराचा चर्चा सुरू आहेत. इतर पक्षातील त्यांची दारं बंद झाल्यामुळे ते अफवा उठवत असतील, असे किरण सामंत म्हणाले.