रत्नागिरी:- राजकारणात एकनिष्ठतेचा वारसा माजी आमदार कै. कुसुमताई अभ्यंकर यांनी दिला. त्यांनी अवहेलना कधीच सहन केली नाही. त्यांचे सर्वच राजकीय पक्षाशी चांगले संबंध होते. कुसुमताई यांच्या नावाने काढलेली ही पतसंस्था यशाच्या शिखरावर कशी जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे माजी आमदार बाळ माने यांनी व्यक्त केले.
माजी आमदार कै. कुसुमताई अभ्यंकर यांच्या स्मृतीदिन कुसुमताई सहकारी पतसंस्थेत झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी अॅड. विलास पाटणे, सतीश शेवडे, प्रसन्न दामले यांच्यासह काही मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनामुळे भव्यदिव्य कार्यक्रम केला नव्हता. फेसबुकद्वारे थेट प्रक्षेपणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. याप्रसंगी प्रस्तावना करताना पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री. शेवडे यांनी कुसुमताईंच्या नावाने काढलेल्या पतसंस्थेच्या कारभाराचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले, कुसुमताईच्या कामाचा ठसा आजही दिसतो. तो त्यांच्या विकासकामांच्या रुपाने. वीज, एसटी यासह गावागावात पाणी योजना राबवण्यात त्यांचा वाटा मोलाचा आहे.
यावेळी अॅड. पाटणे म्हणाले, 1978 ला जनता पक्षाची लाट असल्याने पक्षातील अनेक जेष्ठ व श्रेष्ठ इच्छूक होते; परंतु महिलांकरिता आरक्षित ठेवण्याचा निर्णय झाला. नगरसेविका कुसुमताई अंभ्यकर यांनी मातब्बर उमेदवार शामराव पेंजेंचा पराभव केला. कुसुमताईनी जनसंघाच्या माहिला आघाडी मार्फत महागाई विरुद्ध आंदोलने केली होती. आमदार झाल्यानंतर कुसुमताईंनी ग्रामिण भागातील प्रश्न समजून घेतले. वाडी-वस्तीवर जाऊन महिलांशी संवाद साधला. कळझोंडी गावातील पाणी प्रश्न त्यांच्यामुळेच सूटला. कुसुमताईच्या कामात शिस्त, नियोजन आणि नीटनेटकापणा होता. आयुष्यभर सेवाभावी वृत्तीने काम करणार्या, साहित्यात अजरामर लेणी त्यांनी निर्माण केली आहेत.