रस्ता सुरक्षा जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाची: पोलीस अधीक्षक

रत्नागिरी:- रस्ता सुरक्षेविषयक जबाबदारी केवळ आरटीओ आणि वाहतूक पोलीसांचीच नाही तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.

 येथील आरटीओ कार्यालयात बुधवारी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे 11 ते 17 जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले असून याचा शुभारंभ पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण, उपकार्यकारी अभियंता वीणा पुजारी, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर, राष्ट्रीय महामार्ग उपकार्यकारी अभियंता नरेंद्रकुमार शेंडे, वाहतूक पोलीस सहाय्यक निरीक्षक दत्ता शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

रस्ता सुरक्षा अभियान दरवर्षी आपण राबवितो, केवळ आरटीओ, पोलीस विभागाकडून जनजागृती होते यामध्ये प्रत्येक घटकांनी सहभाग घेणे महत्वाचे आहे, एक आठवडापुरते कार्यक्रम न घेता वर्षभर या सर्व वाहनसंबंधींची नियमांची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

रस्ता सुरक्षा अंतर्गत महामार्गावरील डेंजर स्पॉटची त्वरीत दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी यावेळी सांगितले.

वाहनधारकांनी वाहतूक नियमांची अंमलबजावणी करावी यासाठी आरटीओ कार्यालयाकडून वर्षभर उपक्रम सुरु असतात. शालेय वाहतूक सुरक्षेविषयक व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे यासाठी सर्व वाहतूक संघटनाही सहकार्य करत असल्याचे प्रतिपादन आरटीओ जयंत चव्हाण यांनी सांगितले. तसेच लहान वयातच मुलांना वाहतूकीचे नियम कळावे यासाठीही आरटीओ कार्यालय प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी आस्था दिव्यांग हेल्पलाईन मुख्य समन्वयक संकेत चाळके यांनी अपघातानंतर अपंगत्व आल्यानंतर कुटुंबियांची होणारी वाताहत काय असते हे अनुभवले आहे त्यामुळे आपणही वाहनांचे नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे अन्यथा वाट्याला येणारे दु:ख न पचणारे असते हा कटु अनुभव सर्वांसमोर मांडला.

या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत सहाय्यक आरटीओ अजित ताम्हणकर यांनी आठवडाभरात कोणकोणते उपक्रम कशा पध्दतीने राबविले जाणार आहे याचा आढावा घेतला. यावेळी रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शक पुस्तिका व दिनदर्शिका अनावरण करण्यात आले तसेच काही महिला वाहनचालकांना हेल्मेट वाटपही करण्यात आले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन जान्हवी पाटील यांनी तर आभार प्रदर्शन वाहन निरीक्षक अविनाश मोराडे यांनी केले. यानंतर दुचाकी वाहन रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा मान्यवरांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. दिव्यांग महिला वाहनचालक शबनम तहसिलदार यांचा यावेळी सन्मानही करण्यात आले. गो.जो.महाविद्यालयाचे एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी वाहतूक जनजागृतीपर पथनाट्यही सादर केले.    तसेच डिजीटल स्क्रीनचे अनावरण अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याहस्ते करण्यात आले.

 दुचाकी रॅली महिलांसाठी आयोजित करण्यात आली होती ही रॅली आरटीओ ऑफीस, टीआरपी, साळवी स्टॉप, जयस्तंभ, मारुती मंदिर, नाचणे रोड पुन्हा आरटीओ ऑफीस अशी काढण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आरटीओ कार्यालयाच्या संपूर्ण टीमने उत्तमरित्या पार पाडले.