रत्नागिरी:- पहाटेच्या सुमारास पावसाने जोर धरल्यामुळे मॉन्सून स्थिरावण्याची चिन्हे होती; परंतु रविवारी दुपारनंतर कडकडीत उन पडल्यामुळे रत्नागिरीकरांची निराशा झाली. या पावसाची नोंद जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २२ जुनपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जिल्ह्यात रविवारी (ता. १९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी ९.४४ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड १, दापोली ३, खेड ६, गुहागर १३, चिपळूण १४, संगमेश्वर २७, रत्नागिरी ८, राजापूर १३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून आतापर्यंत सरासरी १२२.३३ मिमी पाऊस झाला असून गतवर्षी ९४१ मिमी नोंद होती. तुलनेत यंदा सर्वात कमी पाऊस झाला आहे. अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वारे कमी दाबाच्या क्षेत्रात वेगाने येत आहेत. त्यामुळे कोकणा विभागासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. सध्यातरी संथ गतीने सक्रिय झाला असला तरी रविवारपासून मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. त्यानुसार पहाटेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. किनारपट्टीवर वेगाने वारेही वाहत होते आणि समुद्रही खवळला होता. सकाळी ११ वाजेपर्यंत रिपरिप सुरु होती. त्यानंतर सुर्यदर्शन झाले आणि कडकडीत उन पडले. हा पाऊस दिवसभर थांबेल अशी चिन्हे होती, पण वार्याबरोबर पावसाचे ढगही पुढे सरकले. सायंकाळी ढगाळ वातावरण होते, हलका पाऊसही झाला. सकाळच्या सत्रात पडलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना सुरवात झाली आहे. पेरलेल्या भाताला हा पाऊस पुरेसा असला तरीही त्यात सातत्य राहीले पाहीजे असे बळीराजाकडून सांगितले जात आहे. पावसाच्या समाधानकारक सक्रियते आधी शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.