रविवारी सकाळपासून अवकाळी पावसाची हजेरी; हापूससह मासेमारी व्यवसाय संकटात

रत्नागिरी:- हवामान विभागच्या अंदाजानुसार रविवारी (ता. 24) रत्नागिरीसह देवरुखमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेले दोन दिवस सलग जिल्ह्यात पाऊस पडत आहे. वेगवान वार्‍यामुळे आणि अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. तर पावसामुळे हापूसची काढणी एकदिवस लांबणीवर गेली आहे. अवकाळी पावसाने हापूससह मासेमारी व्यवसाय संकटात आला आहे.

रविवारी पहाटेपासून आभाळ भरुन आले होते. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अचानक वारे वहायला सुरवात झाली आणि जोरदार पावसाच्या सरी पडू लागल्या. रत्नागिरी शहराजवळील एमआयडीसी, मारुती मंदिर परिसरात मध्यम पाऊस झाला. वर्षभर बाजूला पडलेल्या छत्र्या व रेनकोट घेऊन नागरिक बाहेर पडू लागले. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणार्‍यांचा हिरमोड झाला. अनेकांना बाहेर पडताच आले नाही; मात्र दुचाकी घेऊन फिरण्यासाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांनी मात्र पावसाची तमा न बाळगता आनंद घेतला. शहरातील काही भागात पावसाचे पाणी साचून राहीले होते. दोन तासानंतर पाऊस पूर्णतः थांबला होता. दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत रत्नागिरीत ढगाळ वातावरण होते. दुपारी सुर्यदर्शन झाले आणि कडकडीत उन पडले. सकाळच्या सत्रात पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा होता. देवरुख परिसरातही पावसाच्या जोरदार सरी पडल्या. सलग दोन दिवस तिथे पाऊस कोसळत आहे. त्याचा परिणाम निश्‍चित या परिसरातील आंबा बागायतींवर होणार आहे.

रत्नागिरी तालुक्यात सगळीकडेच हलका पाऊस पडला. विजांच्या कडकडाटामुळे ग्रामीण भागातील विजपुरवठा खंडित झाला होता. पाऊस जास्तकाळ पडत न राहील्यामुळे बागायतदारांची चिंता थोडी कमी झाली आहे. सतत पाऊस पडत राहीला तर मोठ्याप्रमाणात फळगह झाली असती; परंतु पावसामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची भिती बागायतदारांना सतावत आहे. आंबा काळा पडून दर्जावर परिणाम होतो. आंबा तयार होऊ लागला असून पावसामुळे एक दिवसाची काढणी थांबवावी लागली आहे. सध्या वाशी बाजारातील दर कमी झाल्यामुळे बागायतदारांना फटका बसत आहे. दोन दिवसात सर्वच बागायतदार एकाचवेळी आंबा काढणीसाठी घाई करतील. एकाचवेळी मोठ्याप्रमाणात पेटी बाजारात गेली की त्याचा दरावर परिणाम होईल. सध्याच्या पावसामुळे फळाचा आकार वाढेल आणि काढणीसाठी लवकर तयार होण्यास मदत होईल; परंतु ज्या ठिकाणी पानावर बुरशी आलेली असेल ती फळावर उतरण्याची भिती बागायतदार व्यक्त करत आहेत.