सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भूषण गवई यांची प्रमुख उपस्थिती
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा आणि सत्र न्यायालय स्थापनेला १५० वर्ष पूर्ण झाली त्या निमीत्त रत्नागिरी जिल्हा न्यायालय आवारात रविंद्रनाथ टागोरांचे शिल्प उभारण्यात आले आहे. या शिल्पाचे अनावरण दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भूषण गवई यांच्याहस्ते होणार आहे. या कार्यकमाला राज्याचे उद्योगमंत्री व जिह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत हे देखील उपस्थित राहणार आहे
रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या अवारात अनावरण सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांना देखील कार्यकमासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे.सन २०१८ मध्ये तात्कालीन जिल्हा प्रधान न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर यांनी या शिल्पाला मंजूरी दिली होती. हे शिल्प उभारून चार महिन्यांपेक्षा जास्त काळ होवूनही हे शिल्प अनावरणाच्या प्रतिक्षेत होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गवई यांनी अनावरण कार्यकमाला येण्यासंदर्भात वेळ निश्चित केल्याने आता शनिवारी अनावरण करण्यात येणार आहे.
कवी, लेखक रविंद्रनाथ टागोर यांचे बंधु रत्नागिरी जिल्हा न्यायालय येथे प्रमुख जिल्हा न्यायाधीश होते. त्या काळात रविंद्रनाथ टागोर यांचे वास्तव्य रत्नागिरी जिल्हा न्यायालय आवारात काही काळ झाले होते. येथे त्यांनी काही काव्य रचना देखिल केल्या म्हणून त्यांचे शिल्प उभारावे अशी संकल्पना पुढे आली. रविंद्रनाथ टागोर यांचे स्मरणशिल्प या न्यायालयाचे दर्शनी भागात असावे अशी अपेक्षा वकीलांनी व्यक्त केली. याला तत्कालीन प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन व्ही न्हावकर मान्यता देवून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. त्याप्रमाणे सार्वजनीक बांधकाम विभागामार्फत शिल्प उभारण्यात आले.
दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी या शिल्पाचे अनावर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र न्यायमूर्ती गवई यांची वेळ न मिळाल्याने हा अनावरण कार्यकम रखडला होता. गवई हे दोन दिवसांच्या रत्नागिरी जिल्हा दौर्यावर येत असून यामध्ये रत्नागिरी जिल्हा न्यायालय येथील टागोरांच्या शिल्पाचे अनावर व यानंतर मंडणगड येथील न्यायालय इमारतीचे भूमिपूजन होणार आहे.