रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेच्या विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या आणि सदस्यांच्या हातात आता फक्त २६ दिवस उरले आहेत. २७ डिसेंबरला सदस्यांची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे उरलीसुरली कामे उरकण्याची संधी सत्ताधाऱ्यांना मिळाली आहे. २८ तारखेला प्रशासकाची नियुक्ती होणार आहे. पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने हालाचाली सुरू झाल्या आहेत. प्रत्येक पालिकेचा प्रभागरचनेचा कच्चा आराखडा निवडणूक आयोगाने ३ डिसेंबरपर्यत मागवला आहे. एक प्रभाग आणि दोन सदस्य वाढणार असल्याने पालिकेच्या सदस्यांची संख्या ३० वरून ३२ होणार आहे.
कोरोना महामारीमुळे पालिकांच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे गेल्या आहेत. त्या साधारण फेब्रुवारी ते मार्चदरम्यान होण्याची शक्यता आहे. वर्षभरापूर्वीच विद्यमान सदस्य आणि इच्छुकांनी शहरात आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे; मात्र आता त्याला गती आली आहे. प्रभागनिहाय आपल्या मतांची पेरणी करण्याच्यादृष्टीने जोरदार हालचाली सुरू आहेत. पालिकेवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे. १९ सेनेचे, ६ भाजप आणि ५ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य आहे. नियमानुसार २२ डिसेंबरला विद्यमान सदस्यांचा कालावधी संपणार आहे. परंतु पहिल्या सर्वसाधारण सभेनंतर त्या सदस्यांचा कालावधी धरला जातो. त्यानुसार २७ डिसेंबरला विद्यमान सदस्यांची मुदत संपणार आहे. २८ डिसेंबरला पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती होणार आहे.
प्रभागांची फेररचना होणार
२०११ च्या जनगणनेनुसार मतदार यादी तयार करण्यात आली आहे. अंतिम प्रारूप यादी लवकरच प्रसिद्ध होणार असल्याने यादीमध्ये अनेक मतदारांची संख्या वाढणार आहे. पालिकेची सध्या ३० सदस्य संख्या आहे; मात्र प्रभागांची फेररचना होणार आहे. त्यामध्ये एक प्रभाग वाढणार आहे. एका प्रभागात २ सदस्य असतील. १६ प्रभाग होणार आहेत. त्यामुळे सदस्य संख्या ३२ होणार आहे. पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा पालिका प्रशासनाने तयार करून तो निवडणूक आयोगाला ३ डिसेंबरपर्यंत सादर करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार पालिकेने कच्चा आराखडा तयार केला आहे. त्याची पडताळणी करून प्रभाग निश्चिती केली जाईल.