रनप निवडणुकीआधी ‘आप’ची एन्ट्री; प्रतिसादाकडे नजरा

रत्नागिरी:- दिल्लीची सत्ता काबीज केलेल्या आम आदमी पार्टीने आता रत्नागिरीमध्ये एन्ट्री केली आहे. ‘आप’ ली रत्नागिरी, स्वच्छ रत्नागिरी, भ्रष्टाचारमुक्त रत्नागिरी, अशा मजकुराचे होल्डिंग जेल नाका येथे झळकले असून ते सर्वांचे लक्ष वेधुन घेत आहे. रत्नागिरी पालिकेच्या आगामी पंचवार्षीक निवडणुक कधीही लागण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने रत्नागिरीच्या राजकारणात आपले पाऊल टाकले आहे. त्यामुळे येथील राजकीय चुरस वाढण्याची शक्यता आहे.

दिल्लीमध्ये सध्या आम आदमी पार्टीच्या सरकारने चांगली कामगिरी केली आहे. जनतेला अनेक सुविधा देऊन या राजकीय पक्षाने आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये आप ला पुन्हा संधी दिल्यास आरोग्य सुविधा मोफत देण्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. यामुळे संपूर्ण देशात या पक्षाकडे आशेने बघणारा वर्ग निर्माण झाला आहे. या पक्षाची रत्नागिरीत एन्ट्री झाल्याने काहींची धास्ती वाढली आहे. शहरातील विविध समस्यांवर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहेत. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य पालिकेत आहेत. शिवसेनेकडे एकहाती सत्ता आहे. मात्र पाणी योजनेसाठी झालेल्या खोदाईमुळे रस्त्यांची वाताहत झाली आहे. यावरून सत्ताधाऱ्यांबद्धल शहरवासीयांचे मत कलुशीत झाले आहे. येत्या १० ताऱखेनंतर शहरताली रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम होणार आहे. त्यानंतर पुन्हा मतपरिवर्तन होण्याची अपेक्षा सेनेची आहे. त्याअनुषंगाने प्रभाग निहाय बैठका घेऊन पेरणी सुरू केली आहे.

एका नव्या पक्षाचा पर्याय रत्नागिरी शहरातील नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. रत्नागिरीतील तरुण ज्योतीप्रभा पाटील याची आप पक्षाने अंतरिम संयोजकपदी नेमणूक केली आहे. सध्या आपची सभासद नोंदणी सुरु करण्यात आली आहे. यानुसार नवीन सभासद करण्यात येत असून यासाठी नागरिक मोठ्या संखेने संपर्क साधत असल्याचे ज्योतीप्रभा पाटील यांनी सांगितले. सध्यातरी पक्ष विस्तार करण्यासाठी रत्नागिरी शहर डोळ्यासमोर असून येत्या पालिका निवडणुकीसाठी उमेदवार उभे करायचे कि नाही याबाबत राज्य कमिटी निर्णय घेणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.