रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या नव्या आरक्षण सोडतीमध्ये माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी यांना आरक्षणाचा मोठा फटका बसला आहे. प्रभाग क्र. 5 मध्ये ओबीसी व सर्वसाधारण महिला अशी आरक्षण पडल्याने माजी नगराध्यक्षांची मोठी पंचाईत झाली आहे. दरम्यान, जुनी आरक्षण रचना रद्द करून नव्याने नगर परिषदेची आरक्षण सोडत काढण्यात आली.
यापूर्वी रत्नागिरी नगर परिषदेची आरक्षण सोडत जाहीर झाली होती. त्यानुसार निवडणुका होतील असे वाटत असताना ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने नव्याने प्रभाग रचना करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार गुरुवारी रत्नागिरी नगर परिषदेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि इच्छूक उमेदवार यांनी मोठी गर्दी केली होती.
या आरक्षण सोडतीमध्ये पुढीलप्रमाणे प्रभागात आरक्षण पडले आहे. प्रभाग क्र. 1 (अ)सर्वसाधारण महिला, 1(ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. 2 (अ)सर्वसाधारण महिला. 2(ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. 3(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, 3(ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. 4(अ) सर्वसाधारण महिला, 4(ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. 5(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, 5(ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. 6(अ) सर्वसाधारण महिला, 6(ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. 7(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 7(ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. 8(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 8(ब) सर्वसाधारण.
प्रभाग क्र. 9 (अ) अनुसूचित जाती, 9(ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. 10(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, 10(ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. 11(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 11(ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. 12(अ) सर्वसाधारण महिला, 12(ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. 13(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 13(ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. 14(अ) सर्वसाधारण महिला, 14(ब) सर्वधारण, प्रभाग क्र. 15(अ) सर्वसाधारण महिला, 15(ब) सर्वसाधारण, प्रभाग क्र. 16(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, 16(ब) सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे.
या आरक्षण सोडतीचा फटका माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांना बसला आहे. साळवी यांनी प्रभाग क्र. 5 हा सुरक्षित करून ठेवला होता. मात्र नव्या आरक्षणामध्ये या प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला अशी आरक्षणे पडल्याने माजी नगराध्यक्षांची मोठी पंचायत होणार आहे.
प्रभाग क्र. 6 मध्ये सामंत गटाच्या उमेदवारांचे मोठे प्राबल्य आहे. त्यामुळˆˆे माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांना प्रभाग क्र. 6 मध्ये जाण्याकरता सामंत गटात सहभागी व्हावे लागणार आहे. त्यामुळे बंड्या साळवी नेमका कोणता निर्णय घेतात? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रभाग क्र. 5 हा नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीव झाल्याने या प्रभागातून नवा चेहरा मिळण्याची शक्यता आहे.
उमद्या नेतृत्त्वाचा प्रवेश होणार?
नव्याने जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये प्रभाग क्र. 5 मध्ये माजी नगराध्यक्षांना आरक्षणाचा फटका बसल्यानंतर याच प्रभागातून ओबीसी प्रवर्गातील एक तरुण नेतृत्त्व निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर येणार आहे. जनमानसात समाजसेवक अशी ओळख निर्माण झालेल्या उच्चशिक्षित तरुणाचे नाव या प्रभागातून येऊ लागल्याने लवकरच त्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.