रनपतील नगरसेवकच बनलेत ठेकेदार

पालिका भ्रष्टाचाराचे कुरण; चौकशीची मागणी

रत्नागिरी:- पालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. यामध्ये नगरसेविका स्मितल पावसकर, रोशन फाळके, विकास पाटील, निमेश नायर, राजन शेट्ये व उर्वरित काही नगसेवकांची पालिकेवर मक्तेदारी आहे. या मक्तेदारांनी आपल्या नातेवाइकांच्या किंवा निकटवर्तींच्या नावे ठेके घेतले आहेत, असा आरोप करीत पालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून जिल्हाधिकार्‍यांनी हा भ्रष्टाचार कायद्याचा वापर करून रोखावा, असे निवेदन भाजपचे सहप्रवक्ता नित्यानंद दळवी यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले. 

निवेदनात म्हटले आहे की, नगरसेविका स्मितल पावसकर यांनी केलेल्या विकासकामांचा ठेका नातेवाइकांना दिला आहे. सन्मित्रनगर उद्यान 2 कोटी, माळनाका उद्यान सुशोभीकरण 25 लाख, (कै.) प्रमोद महाजन क्रीडा संकुल 1 कोटी 35 लाख, वॉर्डमध्ये इतर कामे 3 कोटी, तारांगण विद्युत काम 1 कोटी, इतर विद्युत कामे दीड कोटीची घेण्यात आली आहेत. उपाध्यक्ष रोशन फाळके यांनीही इतरांचे लायसन्स वापरून नातेवाइकांना सुमारे 5 कोटीची कामे केली आहेत. पाणी सभापती विकास पाटील यांनी एकता मार्गासह वॉर्डमधील 1 ते दीड कोटीची कामे केली व करत आहेत. निमेश नायर हे बांधकाम मटेरिअल सप्लायर (डांबर व लेबर सप्लाय) अशी व वॉर्डातील कामे करत आहेत. सर्वच नगरसेवक वॉर्डातील मक्तेदार ठरवितात. त्यामुळे स्पर्धा होत नाही. विरोधी पक्षातील काही नगरसेवक यामध्ये सामिल आहेत.

पालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद नसताना कोट्यवधीची कामे सुरू आहेत. पालिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे. यामध्ये काही अधिकारी सामिल आहेत. बजेटपेक्षा जास्त खर्च करून खोटी बिले केली जात आहेत. अंदाजपत्रके जास्त प्रमाणात बनविले जातात. सर्व अंदाजपत्रके आणि झालेली कामे यांची बिले समक्ष यंत्रणेकडून तपासावीत. या बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. काही विभागातील कर्मचारी स्वतः मक्ता पद्धतीने कामे करून घेत आहेत. घरपट्टी व पाणी विभागातील बिले काढणे व संगणक प्रणाली सांभाळणे, या कामाचा यामध्ये समावेश आहे. काही अभियंता नोकरी करून मक्तेदार झाले आहेत. मेजरमेंटबुक महिला कर्मचारी प्रचंड आर्थिक कमाई करत आहे, असा आरोपही निवेदनात केला आहे. पाणी अभियंता स्वतः मक्तेदाराचे काम करीत आहेत. शिवाय निधी उपलब्ध न झाल्यास 58-2 खाली निधी खर्च केला जात आहे. पालिकेच्या सर्व विभागात मक्ता पद्धत सुरू असून त्यावर कोणाचे नियंत्रण नाही. जिल्हाधिकार्‍यांनी कायद्याचा वापर करून हा भ्रष्टाचार रोखावा, असे निवेदनात म्हटले आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे सुरू आहेत. मुख्य रस्ता, एसटी स्टँड, आठवडा बाजार, मारूती मंदिर, अंगण प्लाजा आदी ठिकाणी अनधिकृत खोकी उभारली जात आहेत. यातून हप्ते गोळा केले जातात, असा आरोप केला आहे.