रनपच्या शिरपेचात मानाचा तुरा; सलग तिसऱ्या वर्षी स्वच्छतेचा पुरस्कार

रत्नागिरी:- स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियाना अंतर्गत रत्नागिरी नगर परिषदेचा देश पातळीवर दहावा क्रमांक आला आहे. सलग तिसऱ्या वर्षी पुरस्कार पटकवण्याचा पराक्रम रनपने केला आहे. यामुळे रनपच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.   

स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत पुरस्कार गुरुवारी केंद्र सरकार कडून जाहीर करण्यात आले. केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप पुरी यांनी याबाबत घोषणा केली. रत्नागिरी नगरपालिकेला ५० हजार ते १ लाख लोकवस्तीच्या गटात स्थान देण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील एकूण ४२ शहरांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी पालिकेने सलग तिसर्या वर्षी यात स्थान मिळविले आहे. कचरा निर्मितीच्या ठिकाणी संकलन, वर्गीकरण करणे, शहरात १०० टक्के कचरा संकलन, कचऱ्या पासून खतनिर्मिती आदी प्रकल्प पालिकेने उभे केले आहेत.रत्नागिरी शहराने ओडीएफ  मानांकन देखील मिळविले आहे. रनपला जाहीर झालेला पुरस्कार हा नगरसेवक, अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यामुळेच मिळाल्याचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सांगितले.