रनपच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

रत्नागिरी:-  राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी (ता. २) रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून घेण्यात आलेल्या रत्नागिरी पालिकेच्या  नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन होणार आहे. पालकमंत्री ॲड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. 

रत्नागिरी पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा विषय अनेक वर्षे रखडला होता. मात्र शिवसेचे सत्ताधारी आणि मंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे १४ कोटीची तीन मजली प्रशासकीय इमारत होणार आहे. येथील निर्माण ग्रुपला याचा ठेका मिळाला असून वर्षामध्ये इमारत उभी करण्याचे उद्दिष्ट या ठेकेदार कंपनीपुढे आहे. नवीन इमारतीच्या कामाचे भुमिपूजन नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. ते सकाळी हेलिकॉप्टरने १०.३० वाजता ठाण्यातून रत्नागिरी विमानतळावर येणार आहे. ११ वाजता त्याच्या हस्ते पालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील पालिका, नगरपंचायतीच्या प्रशासकीय व विविध विकास कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे. नंतर ते ठाण्याला रवाना होणार आहेत. कार्यक्रमाला पालकमंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, विधानपरिषद सदस्य अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, मुख्याधिकारी तुषार बांबर, उपनगराध्यक्ष रोशन फाळके आदी उपस्थित राहणार आहेत.