रनपच्या नव्या इमारतीसाठी पाच कोटीचा निधी मंजूर 

नव्या इमारतीचे काम लवकरच; महिन्याभरात वर्कऑर्डरचा प्रस्ताव 

रत्नागिरी:- स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये धोकादायक ठरलेल्या रत्नागिरी नगर पालिकेच्या आधुनिक इमारतीचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल अशी आशा निर्माण झाली आहे. या इमारतीसाठी पाच कोटी रुपये मंजूर असून वर्कऑर्डरसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. महिन्याभरात नगरविकास विभागाकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रक्रिया केली जाणार आहे.

रत्नागिरी पालिकेच्या इमारतीला सुमारे 48 वर्षे होऊन गेली आहेत. 16 मे 1971 रोजी तत्कालीन आमदार शामराव पेजे यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले होते. ही इमारती जीर्ण झाल्यामुळे ती खराब झाली आहे. इमारतीच्या सर्वात वरील मजल्यावर नगराध्यक्षांचे दालन आहे. या दालनावरील छप्परही लिकेज झाले असल्याने पावसाळ्यात तिथे बसणे अडचणीचे होते. तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे. उपनगराध्यक्ष, पाणी सभापती वगळता अन्य सभापतींसह सदस्यांसाठी इमारतीत कक्ष नाही. दुसर्‍या मजल्यावरील गॅलरीतील बांधकामही निखळले असून अनेक ठिकाणी स्लॅबला भेगा गेल्या आहेत. प्लास्टरच निखळल्याने आतील लोखंडी सळ्या बाहेर लटकत आहेत. दर्शनी भागातील जिन्याचा स्लॅब पडण्याची भितीही निर्माण झालेली आहे. पुणे येथील केबीपी सिव्हील इंजिनिअरिंग सव्हीर्सेस केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत वापरास अयोग्य असल्याचे सांगितले होते. त्यानंतर नवीन इमारतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार नव्या इमारतीसाठी वेगाने कार्यवाही सुरू झाली आहे.
तिन मजली अद्ययावत इमारत उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून सर्वात वरच्या मजल्यावर नागरिकांसाठी रत्नागिरी दर्शनासाठी स्पेशल गॅलरीही तयार केली जाणार आहे. नगराध्यक्ष दालनासह सभागृह, सभापती दालने, विविध विभागांसाठी स्वतंत्र खोल्या, मुख्याधिकारी दालन, विषय समित्यांच्या बैठकांसाठी दालने, विश्रांतीगृह, स्वागत कक्ष, लिपमट, स्थायी समिती बैठक सभागृह आदीचा समावेश आहे. साडे तेरा कोटीचा प्रस्ताव नगर पालिकेकडून तयार करण्यात आला आहे. इमारतीसाठी पाच कोटी रुपये शासनाकडून पालिकेला प्राप्त झाले आहेत. राज्य सरकारकडून राज्यात एकाच प्रकारच्या पालिकेचे डिझाईन निश्‍चित केले आहे. त्यानुसार पालिकेच्या आराखड्यात बदल करण्यात आले आहेत. तो प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजूरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही होईल. निविदा काढण्यासाठीची तयारी पालिका प्रशासनाकडून केलेली आहे.