रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन गुरुवार पासून बदलले जाणार आहे. बुधवारी एकाचवेळी संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करण्यात आला. तर गुरुवारी शहराच्या खालच्या भागाला त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शहराच्या वरच्या भागाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन रत्नागिरी नगर परिषदेच्या पाणी विभागाने केले आहे.
यापूर्वी एक दिवस आड पाणीपुरवठा केला जात होता. एकाच दिवशी संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करताना पाण्याचा दाब कमी असल्याने कमी पाणी मिळत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्यानंतर पाणीपुरवठ्याचे नवीन नियोजन करण्यात आले असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले. अलनिनोच्या प्रभावामुळे पाऊस उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. अशावेळी शहराला पाणीपुरठा करणार्या शीळ धरणातील पाणी बचत व्हावी यासाठी खबरदारी घेण्यात आली. त्यानुसार महिनाभरापूर्वीपासून शहराला एकदिवसआड पाणीपुरवठा सुरु करण्यात आला. परंतु, गेल्या काही दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने पाणी दिले जाणार्या एका तासात पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे येत्या गुरुवारपासून शहराचा खालचा भाग आणि वरचा भाग असे दोन भाग करून गुरुवारी खालच्या भागाला पाणी दिले जाणार आहे. शुक्रवारी शहराच्या खालचा भागाचा पाणीपुरवठा बंद राहून वरच्या भागाला पाणीपुरवठा होणार आहे.
रत्नागिरी शहराला शीळ धरणातूनच पाणी पुरवठा केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून घेण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. पानवल धरणातील पाणीपुरवठा नवीन पाणी योजनेतील नाचणे जलशुद्धीकरण केंद्राच्या कामासाठी बंद आहे. नाचणे तलावाचेही पाणी संपले आहे. त्यामुळे रत्नागिरी शहराच्या पाण्याचा भार एकट्या शीळ धरणावर आहे. या धरणा व्यतिरिक्त पाण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने मान्सून सुरु होईपर्यंत शहरवासियांनी पाणी काटकसरीने वापरण्याची आवश्यकता आहे.