रनपचे पथक गाळे सील करण्यासाठी गेले आणि हात हलवत परतले

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर स्टेडियम मधील 11 गाळे सील करण्यासाठी गेलेल्या रनपच्या पथकाचा पुरता फियास्को उडाला. गाळे सील करण्यासाठी गेलेल्या पथकाला गाळेधारकांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरेत देता आली नाहीत. याशिवाय पोलीस संरक्षण न घेताच पथक घटनास्थळी पोचले. पथकाचा संपूर्ण दिवस पोलीस संरक्षणाची वाट पाहण्यातच गेला. अखेर सायंकाळी कोणतीही कारवाई न करताच पथक माघारी परतले.

मालमत्ता विभागाचे कर्मचारी सकाळी साडे अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास मारूती मंदिर येथील गाळे धारकांकडे गेले. आम्ही गाळा सील करण्यासाठी आलो आहे, असे स्पष्ट करीत दुकानदारांना गाळे खाली करण्यास सांगितले. परंतु गाळेधारकांनी आवाज चढविल्यानंतर रनपचे कर्मचारी नरमले. आम्हाला आदी नोटीस का दिली नाही, ताब्यात घेण्याबाबत न्यायालयाचा आदेश आहे का, असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले. त्यानंतर तेज कुरिअरच्या दुसर्‍या गाळ्यात जाऊन मालमत्ता विभागाच्या कर्मचार्‍यांनी कागदी घोडे नाचवत पंचनामे सुरू केले. मात्र गाळे सील करण्याबाबत गाळे मालकांना खडसावून सागण्याची धाडस झाले नाही. पोलिस संरक्षणात हे गाळे सील करण्याचे आदेश होते. पोलिसांना पालिकेने फक्त पत्र दिले. अपेक्षित न्यायालयाच्या आदेशापासून अन्य कागदपत्र दिली नव्हती. त्यामुळे पोलिस संरक्षण देण्यास पोलिसांनी दिरंगाई केली. दुपारनंतर काही कागदपत्र दिली. मात्र पोलिस अधीक्षकांचा आदेश नसल्याने रनपला सायंकाळी उशिरापर्यंत बंदोबस्त मिळालाच नाही. अखेर मालमत्ता विभागाचे पथक हात हालवत परतले. प्रशासनाचा हा कारवाईचा केवळ फार्स झाला.