रनपचा आणखी एक कारनामा! स्कायवॉकवर २६ लाख खर्चून उभारणार गार्डन

रत्नागिरी:- एकीकडे शहरात पडलेले खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक सामग्री नसताना जांभ्या दगडाने तात्पुरती मलमपट्टी हाती घेतली जात असताना दुसरीकडे अनावश्यक असलेल्या स्कायवॉक गरज नसताना गार्डन उभारण्यासाठी लाखोंची उधळपट्टी केली जाणार आहे. काही विद्यार्थ्यांकडून वापरात असलेल्या या स्कायवॉक वर आता २६ लाख रुपये खर्ची टाकून एक गार्डन तयार करण्याची शक्कल रनप प्रशासनाने लढवली आहे.

सहा वर्षांपूर्वी माळनाका परिसरात स्कायवॉक उभारण्यात आला. माळनाका हा रहदारीचा परिसर असल्यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांनी स्कायवॉकचा वापर करावा असा त्यामागे उद्देश होता. मात्र हा उद्देश निष्फळ ठरला. कारण स्कायवॉकच्या पायऱ्या चढून उतरुन जाण्याकडे अनेकांनी पाठ फिरवली. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच विद्यार्थ्यांकडून या स्कायवॉकचा वापर सध्या सुरू आहे. त्यापेक्षा काही क्षणात रस्ता ओलांडता येत असल्यामुळे स्कायवॉकवरुन कोणीही फिरकत नाही.

स्कायवॉकचा वापर शून्य होत असल्यामुळे स्कायवॉकचा नागरीकांनी वापर करावा याकरीता रनपने नवीन शक्कल लढवली गेली आहे.
स्कायवॉकवर आता व्हर्टीकल गार्डन उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या व्हर्टीकल गार्डनसाठी जिल्हा नियोजनमधून 26 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आधीच स्कायवॉकचा उददेशन निष्फळ झाल्यामुळे दोन कोटींचा चुराडा झाला. त्यात आता आणखी २६ लाखांची भर पडणार आहे. शहरामध्ये अनेक जिवनावश्यक प्रश्न प्रलंबित असताना ही 26 लाखांची उधळपट्टी कशासाठी? असा प्रश्न नागरीक विचारत आहेत.

स्कायवॉकवर व्हर्टीकल गार्डनची शक्कल लढवण्यात आली आहे. यामध्ये साधारण दीड फूटापर्यंतच वाढणारी आणि कमी सूर्यप्रकाश लागणारी झाडे लावण्यात येणार आहेत. लिली, सप्तपर्णी अशा झाडांचा यामध्ये समावेश असेल. अनेकठिकाणी अशाप्रकारची इनडोअर गार्डन असतात त्या पार्श्वभूमीवर हे गार्डन उभारण्यात येईल. त्याला लाकडाची सजावटही करण्यात येणार आहे. तसेच ठेकेदाराकडे काही नवीन संकल्पना असल्यास त्याचाही त्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे.