पर्यटनवाढीसाठी संकल्पना; छत्रपती संभाजीराजेंचा पुतळा, विठ्ठलमूर्ती, शिवसृष्टीही
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराचे वैभव अधिक खुलून दिसावे यासाठी शहराला ऐतिहासिक आणि धार्मिकतेची जोड देणारे भव्यदिव्य आकर्षक पुतळे उभारले जात आहेत. छत्रपती संभाजी राजे यांचा राज्यातील सर्वांत उंच पुतळा जिजामाता उद्यानात उभारला आहे. जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, माळनाका येथील विठ्ठलाची मूर्ती आणि भगवती किल्ल्यावरील शिवसृष्टीमुळे रत्नागिरी स्टॅच्यू सिटी म्हणून नावारूपाला येणार आहे.
गोवा, केरळप्रमाणे रत्नागिरीतही स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. या दोन्ही राज्याच्या तुलनेत कोकणासह रत्नागिरीचा अपेक्षित पर्यटन विकास झालेला नाही. त्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्यादृष्टीने व्हिजन म्हणून मंत्री उदय सामंत काम करत आहेत. आज कौशल्य विकासकेंद्रांपासून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत सर्व शैक्षणिक सुविधा त्यांच्या पुढाकारामुळे उपलब्ध झाल्या. रत्नागिरी शहरातही पर्यटक थांबावा आणि त्या अनुषंगाने रत्नागिरीचा पर्यटन विकास साधण्यासाठी वेगळी संकल्पना त्यांनी मांडली असून, ती सत्यात उतरत आहे. रत्नागिरी शहरामध्ये ऐतिहासिक वारसा असलेले थिबा पॅलेस, रत्नदुर्ग किल्ला, पतितपावन मंदिर, लोकमान्य टिळक जन्मस्थळ, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना ठेवलेल्या विशेष कारागृहालाही पर्यटक भेट देतात आणि निघून जातात. यामुळे अपेक्षित पर्यटन विकास होताना दिसत नाही. त्यामुळे पर्यटनवाढीसाठी नवनवीन संकल्पना राबवल्या जात आहेत. माळनाका येथे ३० फुटाची विठ्ठलाची पूर्णाकृती मूर्ती उभारण्यात आली आहे. राज्यातील सर्वांत मोठा छत्रपती संभाजी राजे यांचा पूर्णाकृती पुतळा जिजामाता उद्यान येथे उभारण्यात आला आहे. माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचीही या उद्यानामध्ये मूर्ती ठेवण्यात आली आहे. भगवती किल्ला येथे शिवसृष्टी उभारली जात असून, तेथेही अनेकांच्या मूर्ती असणार आहेत. शहरात मुख्य रस्त्यावर यापूर्वीच अनेक पुतळे आहेत. थिबा पॅलेस येथील लेजर शो, शहरात होणारे क्राँक्रिटीकरण, टिळक जन्मभूमीचे नूतनीकरण, अद्ययावत नाट्यगृह यामुळे रत्नागिरी शहर पर्यटन शहर म्हणून विकसित होत आहे.
५६ फूट उंच पुतळा
छत्रपती संभाजी राजे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचा पाया ३५ फूट असून वर २१ फूट असा एकूण ५६ फूट उंच पुतळा आहे. सुमारे दीड कोटी यावर खर्च करण्यात आले आहेत. विठ्ठलाची ३० फुटाची मूर्ती असून, त्यावरही सव्वा कोटी रुपये खर्च केले आहेत. ४ फेब्रुवारीला छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याचे अनावरण आहे. ५ ला सुमारे ३ हजार वारकऱ्यांच्या उपस्थितीत विठ्ठलाच्या मूर्तीचे अनावरण होणार आहे.
उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांची ही संकल्पना आहे. पर्यटनवाढीच्यादृष्टीने छत्रपती संभाजी राजे यांचा राज्यातील सर्वांत उंच पुतळा उभारला आहे. विठ्ठलाची मूर्ती, शिवसृष्टी आदींमुळे पर्यटनवाढीला चांगली चालना मिळणार आहे.
–तुषार बाबर, मुख्याधिकारी, रत्नागिरी पालिका