रत्नागिरी:- लोकसभा निवडणुकीच्या ४ जूनला होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी निवडणूक विभागाने १ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक विधानसभेला १४ टेबलांवर ईव्हीएम तर एका टेबलावर पोस्टल मतदान मोजणीची व्यवस्था केली आहे. सरासरी ३५ हजार मतांची मोजणी एका फेरीत अशा एकूण २५ फेऱ्या होणार असल्याने लोकसभेचा निकाल स्पष्ट होण्यास दुपारी अडीच वाजण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सकाळी ११ वाजेपर्यंत मतदार संघाचा कौल कुणाला, हे कळणार आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या ४ जूनला होणाऱ्या मतमोजणीकडे जनतेचे लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणूक देशभरात पाच टप्प्यात होत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान झाले. यामध्ये ४ लाख ५९ हजार ९९ पुरुष तर ४ लाख ४८ हजार ५१८ महिला अशा एकूण ९ लाख ७ हजार ६१८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदार संघात ६२.५२ टक्के इतके मतदान झाले आहे.
रत्नागिरीतील एफसीआय गोदामामध्ये ईव्हीएम मशिन पोलिस बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. याच गोदाम परिसरात मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. लोकसभा मतदार संघात ६ विधानसभेचे मतदार संघ आहेत. मतमोजणीसाठी प्रत्येक मतदारसंघाप्रमाणे सहा विभाग केले जाणार आहेत. प्रत्येक मतदारसंघासाठी १४ टेबल ईव्हीएम मशिनमधील मतमोजणीसाठी लावली जाणार आहेत. प्रत्येक मतदार संघाचे १५व्या टेबलवर पोस्टल मतांची मोजणी होणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्य समोरच पोस्टल मतांची तपासणी केली जाणार आहे. या मतमोजणीसाठी शिपायापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जवळपास १ हजार कर्मचारी लागणार आहेत. त्याचे नियोजन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या उपस्थितीत केले जात आहे.