रत्नागिरी समुद्रात परप्रांतीय मच्छीमारांचा फिशरीजच्या नौकेवर हल्ला

रत्नागिरी:- जिल्ह्याच्या सागरी हद्दीत घुसून मासेमारी करणार्‍या परप्रांतीय नौकांची घुसखोरी वाढत चालली आहे. अगदी १२ वावाच्या आत येऊन मासेमारी करणार्‍या या परप्रांतीय मच्छिमारांनी चक्क फिशरीजच्या नौकेवर हल्ला करून नौकेतील कर्मचार्‍यांवर जीवघेणा हल्ला चढवला. मात्र कर्मचार्‍यांनी दाखवलेल्या चातुर्यामुळे गस्ती नौकेतील ७ जण बालंबाल बचावले. खोल समुद्रात हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे.

एकीकडे नैसर्गिक संकट तर दुसरीकडे वारंवार तापमानात होणारे बदल यामुळे स्थानिक मच्छिमार मेटाकुटीला आले आहेत. त्यातच परप्रांतीय नौकांची घुसखोरी वाढू लागल्याने स्थानिक मच्छिमारांच्या नौका बंदरात नांगर टाकून विसावल्या आहेत. मोठे आर्थिक संकट स्थानिक मच्छिमारांवर ओढवलेले असताना परप्रांतीय मच्छिमार मात्र राजरोस जिल्ह्याच्या सागरी हद्दीत घुसून मासेमारी करताना दिसून येत आहेत. या नौकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या गस्ती नौकांवरच जीवघेणे हल्ले परप्रांतीय मच्छिमारांकडून होत आहेत.

प्रकरणाची वाच्यताच नाही
गेल्या काही महिन्यांपासून परप्रांतीय मच्छिमारांची घुसखोरी सुरू असताना अनेक तक्रारी मत्य विभागाकडे आल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक मत्स्य आयुक्त अभयसिंह शिंदे इनामदार हे स्वतः आपल्या सहकारी कर्मचार्‍यांना घेऊन कारवाईसाठी समुद्रात गेले होते. त्यावेळी परप्रांतीय ट्रॉलर्सवर असलेल्या मच्छिमारांनी जीवघेणा हल्ला चढवला होता. मात्र या प्रकरणाची वाच्यता कुठेच झाली नाही.

कारवाईसाठी रवाना झाले
हा प्रकार साधारण दीड महिन्यापूर्वी घडला असून मल्पी कर्नाटकातील ३० भलेमोठे ट्रॉलर्स जिल्ह्याच्या सागरी हद्दीत घुसून अनधिकृतरित्या मासेमारी करीत असल्याची माहिती मत्स्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक मत्स्य आयुक्ततांच्या नेतृत्वाखाली एक पथक कारवाईसाठी खोल समुद्रात गेले होते.
हल्ला केला
मत्स्य विभागाचे पथम गस्तीसाठी समुद्रात गेले त्यावेळी अंदाजे २५ ते ३० परप्रांतीय ट्रॉलर्स अनधिकृतरित्या मासेमारी करताना दिसून आले. नौकांच्या कागदपत्र तपासणीसाठी गस्ती नौका पुढे गेली असता परप्रांतीय ट्रॉलर्सवरील मच्छिमारांनी मत्स्य विभागाच्या नौकेवर हल्ला चढविला.

शिशाचे गोळे फेकले
आपण पकडले जावू या भीतीने पररप्रांतीय मच्छिमारांनी वायरलेसद्वारे आपल्या इतर नौकांना त्याबाबतचा संदेश दिला आणि तात्काळ मत्स्य विभागाच्या नौकेवर हल्ला सुरू केला. यावेळी शिशाचे गोळे मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेवर फेकण्यात आले. तसेच ज्वालाग्राही पदार्थांसह आगीचे बोळेदेखील फेकण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

गस्ती नौका घेरण्याचा प्रयत्न
यावेळी परप्रांतीय मच्छिमारांनी मत्स्य विभागाची नौका घेरण्यासाठी आपले ट्रॉलर्स पुढे आणले. एकीकडे हल्ला सुरू होता तर दुसरीकडे गस्ती नौका घेरण्यासाठी इतर ट्रॉलर्स पुढे येत होते. मात्र मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांनी मोठी हुशारी दाखवून आपली नौका सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

गस्ती नौकेचा पाठलाग
मत्स्य विभागाची गस्ती नौका बाहेर पडत असताना गणपतीपुळेच्या दिशेने वळली आणि त्याचवेळी परप्रांतीय मच्छिमारांनी गस्ती नौकेचा पाठलाग सुरू केला. अत्यंत साधी नौका असूनदेखील गस्ती नौकेतील कर्मचार्‍यांचे प्राण वाचावेत यासाठी सारे प्रयत्न करण्यात आले.

कोस्टगार्डला कॉल दिला होता
यावेळी समुद्रात सुरू झालेल्या जीवघेण्या प्रकाराबाबतची माहिती तात्काळ कोस्टगार्डला कॉल करुन दिली मात्र त्यांच्याकडून कोणतीही मदत न मिळाल्याने नुकत्याच झालेल्या कोस्टगार्डच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटल्याची माहिती पुढे आली आहे. आमचा जीव जाण्याची वेळ आली होती मात्र मदन न करता लेखी अर्जाची मागणी झाल्याची माहितीदेखील मत्स्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी दिली आहे.

प्रशासन कोणती भूमिका घेणार
एकीकडे स्थानिक मच्छिमार मेटाकुटीला आलेले असताना परप्रांतीय मच्छिमारांची सुरू झालेली घुसखोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे आता मच्छिारांचे लक्ष लागून आहे. परप्रांतीय मासेमारी तात्काळ थांबावी यासाठी जिल्हा प्रशासनाने ऍक्शन प्लॅन तयार करावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.