उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
रत्नागिरी:- मा. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती शताब्दी उपक्रमाअंतर्गत शासकीय विभागीय ग्रंथालय रत्नागिरी या कार्यालय इमारतीच्या दुरुस्ती, नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी 4 कोटी 25 लाखांच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली.
ना. सामंत म्हणाले की, ग्रंथालय अधिक समृद्ध करण्यासाठी व वाचकांना अधिकाधिक व आधुनिक सेवा देण्याकरीता ग्रंथालयाचे आधुनिकीकरण, संगणीकीकरण व डिजीटलायझेशन व अत्याधुनिक ग्रंथालयातील वाचन साहित्य व साधने विकसीत करणे आवश्यक आहे. सन १९७२ पासून या इमारतीचे किरकोळ स्वरुपाच्या दुरुस्त्या वगळता भरीव असे नुतनीकरण करण्यात आलेले नाही. सद्यस्थितीत ग्रंथालयातील लोकमान्य टिळक यांचे स्मारक असलेले दालन, वाचन कक्ष, ग्रंथालयीन कर्मचारी कक्ष या ठिकाणी छतावरचे पाणी झिरपत असून काही ठिकाणी छताचे स्लॅब कोसळत आहे. व त्यातून जिवित हानी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तसेच ग्रंथालयाची संरक्षक भिंत ठिकठिकाणी पडझड झालेली आहे. या सर्व कारणाने ग्रंथालयाचे नुतनीकरण, सुशोभीकरण व आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे.असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.