रत्नागिरी:- तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले असताना आता चोरट्यांनी शहराकडे मोर्चा वळवला आहे. भरदिवसा चोरी करण्याएवढी मजल चोरट्यांची वाढली आहे. रत्नागिरी शहरातील नाचणे आय टी आय येथील शाकंभरी अपार्टमेंट मधून 95 हजार 400 रुपयांच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची फिर्याद शहर पोलिस स्थानकात देण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद अक्षय सुनील जोशी (29, रा.शाकंभरी अपार्टमेंट नाचणे, रत्नागिरी ) यांनी दिली. ही घटना 1 जुलै रोजी सकाळी 9 सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय जोशी यांच्या घरी कोणी नसल्याचा फायदा उठवत अज्ञाताने दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटामध्ये ठेवलेले 93 हजार रुपये किमतीचे 3 तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, 1200 रुपये किमतीची 1 ग्रॅम वजनाची नथ तसेच 1200 रुपये किमतीचा एक चांदीचा मेखला असा एकूण 95 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.
अक्षय सुनील जोशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञातावर 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले करत आहेत.