रत्नागिरी शहरात पुन्हा भरदिवसा घरफोडी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात एकामागून एक घरफोडीच्या घटना समोर येत आहेत. साळवी स्टॉप येथे घरफोडीच्या घटनेबरोबरच आत्ता शहरातील जोशी पाळंद येथे चोरट्यांनी बंद घर फोडल्याचे समोर आले आहे. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ च्या सुमारास घडली. चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. परंतु कोणताही किंमती ऐवज त्यांच्या हाती लागला नाही. त्यामुळे चोरट्यांनी बेडरुमधील कपाट उचकटून आतील सामान अस्ताव्यस्त केल्याचे दिसून आले.

या प्रकरणी अनिल आग्रे यांनी रत्नागिरीं शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आग्रे हे शिक्षक असून ते २७रोजी सकाळी शाळेवर गेले होते. दुपारी १ च्या सुमारास ते घरी आले असता त्यांना घराचा मुख्य दरवाजा उचकटलेल्या स्थितीत दिसून आला. तसेच त्यांनी बेडरुममध्ये जावून पाहिले असता आतील लोखंडी कपाटाचे लॉक उचकटून आतील लॉकरही फोडलेला होता. कपाटामध्ये चोरट्यांच्या हाती किंमती ऐवज न लागल्याने चोरट्यांनी घरातील इतर सामानही अस्ताव्यस्त केले. नुकतेच शहरातील साळवी स्टॉप येथे बंद घर चोरट्यांनी फोडून सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. यानंतर चोरट्यांनी जोशी पाळंद येथे घर फोडले. दोन्ही चोरीच्या घटना सारख्याच पद्धतीने झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परजिल्ह्यातील चोरट्यांच्या टोळीचे हे काम असावे, असे बोलले जात आहे.

दरम्यान चोरीचा प्रकार समोर येताच रत्नागिरी शहर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. तसेच श्वानपथकालाही येथे पाचारण करण्यात आले होते. मात्र या ठिकाणी चोरट्यांचा कोणताही सुगावा पोलिसांना लागला नाही. दोन्ही चोरीच्या घटनांनंतर पोलिसांच्या गस्तीपथकांना अलर्ट करण्यात आले आहे. जोशी पाळंद येथे झालेल्या चोरीच्या प्रकारात चोरट्यांना काहीच हाती लागले नसल्याचे सांगण्यात आले.