रत्नागिरी शहरात चार ठिकाणी सिग्नल यंत्रणा होणार कार्यान्वित

जिल्हा नियोजन मधून निधीची तरतूद

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात चार ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्री उदय सामंत आणि पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मंजूर झाला. याची निविदा प्रक्रियाही सुरु झाली आहे.

रत्नागिरी शहरातील सिग्नल यंत्रणा बंद झाली होती. कोरोना काळात वाहतूक पोलिसांकडून सिग्नल बंद ठेवण्यात आले होते. या दरम्यानच रत्नागिरी शहराच्या नवीन नळपाणी योजनेच्या कामासाठी रस्ते खोदाई करावी लागली. ही कामे करताना काही सिग्नलच्या विद्युत केबल तुटल्या गेल्या. मारुती मंदीर येथील शिवसृष्टीच्या कामासाठी याठिकाणचे सिग्नलचे खांब काढावे लागले. रत्नागिरी शहरात वाहनांची मोठ्या प्रमाणात रेलचेल वाढली असल्याने वाहतूक नियमनासाठी सिग्नल यंत्रणा आवश्यक झाली होती.
पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार वाहतूक पोलिसांनी रत्नागिरी नगरपरिषदेकडे सिग्नल यंत्रणा सुरु करण्याबाबत पत्र व्यवहार सुरु केला. हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे गेल्यानंतर सुमारे 50 लाख रुपयांची निधी मिळण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला. आता हा निधी मंजूर झाला असून मारुती मंदिर, जेलनाका, जयस्तंभ, रामआळी नाका याठिकाणी सिग्लन यंत्रणा बसवण्याबाबतची निविदा निघाली आहे.