रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील फुटपाथ आणि पादचारी मार्गावर अतिक्रमण करून बसणाऱ्या विक्रेत्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. रनपच्या अतिक्रमण हटाव पथकाने अशा पाच ते सहा विक्रेत्यांवर सोमवारी कारवाई केली असून पुढील काही दिवस ही कारवाई सुरूच राहणार आहे.
शहरातील फुटपाथ आणि मुख्य रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांनी कब्जा केला आहे. रहदारीच्या ठिकाणी रस्त्यालगत बसणाऱ्या या विक्रेत्यांमुळे अनेकदा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. शहरातील जेलनाका येथे रस्त्याच्या दुतर्फा विक्रेते बसत असल्याने खरेदीसाठी उभ्या राहणाऱ्या गाड्यांमुळे ट्रॅफीक जाम होते. यावर उपाय म्हणून सोमवार पासून अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करण्यात आली.
नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्या सूचनेनुसार सोमवारी फुटपाथ आणि रस्त्यावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. प्रथम जेलनाका येथे फुटपाथ आणि मेंटल हॉस्पिटल बाहेर बसणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यासह एसटीस्टँड बाहेर बसणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर देखील कारवाई करण्यात आली. मागील काही दिवसांपासून एसटी स्टँड बाहेर बसणाऱ्या विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यामुळे या ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय रामआळीत रहदारी करणारे फेरीवाले आणि हातगाडीवाले यांच्यावर कारवाई करण्यात आली. पुढील काही दिवस ही कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सांगितले.