रत्नागिरी शहरातील १५० नागरिकांनी पाहिले खंडग्रास सूर्यगहण

रत्नागिरी:- मंगळवारी दशकातील शेवटचे खंडग्रास सूर्यग्रहण होते. ग्रहण थेट डोळ्यांनी पाहणे अयोग्य असल्याने गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या खगोल अभ्यासकेंद्रातर्फे भाट्ये झरी विनायक येथे ग्रहण पाहण्यासाठी खास व्यवस्था उपलब्ध केली होती. शहरातील १५० नागरिकांनी खंडग्रास सूर्यगहण पाहण्याचा आनंद घेतला.

सायंकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ झाला. एक तास १४ मिनिटे १६ सेकंद एवढा ग्रहणाचा कालावधी होता. ग्रहण सुरू होताच हळूहळू सूर्यबिंबाची तेजस्विता कमी झाली. ३६ टक्के सूर्याचा भाग झाकोळला गेला. त्यामुळे नेहमीएवढा सूर्याचा प्रकाश जाणवला नाही. दिवसा काही प्रमाणात अंधार जाणवत होता. सायंकाळी ६.३१ वाजता सूर्यास्त झाल्याने ग्रहण दिसले नाही. ग्रहण पाहण्यासाठी खास टेलिस्कोपीची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी खास फिल्टर लावून फोटो घेतले.

ग्रहण काळात काही खाऊ नये, पिऊ नये, असे सांगितले जाते मात्र भाट्ये किनाऱ्यावरील फूड स्टाॅलवर खवय्यांची चांगलीच गर्दी होती. त्यामुळे ग्रहणाविषयी तर्क फोल असून वैज्ञानिक दृष्ट्या ग्रहण पाहण्यासाठी माहिती घेण्यासाठी शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

महाविद्यालयाच्या खगोल अभ्यासकेंद्राचे डाॅ.बी. डी सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार ठाकूर देसाई, वर्षा काळे, प्रणव चव्हाण,श्रेयस बाचरे, सम्यक हातखंबकर या विद्यार्थ्यांनी ग्रहण कसे पाहावे, यासाठी व्यवस्था नागरिकांसाठी केली होती. डोळ्यांनी थेट पाहणे अयोग्य असल्याने ग्रहण पाहण्यासाठी दुर्बिणीची व्यवस्था केली होती. खगोल अभ्यास केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद नागरिकांनी सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद घेतला.