रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य

रत्नागिरी:- दरवर्षीप्रमाणे रत्नागिरी शहरातील गुळगुळीत रस्त्यांचे स्वप्न भंगले आहे. पहिला पावसाचा जोर ओसरल्यानंतर शहरातील खड्ड्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. शहरातील 80 फुटी मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. यावर उपाययोजना करताना पालिकेला कसरत करावी लागत आहे.

शहरातील मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 96 कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांनी मंजूर झाला आहे. पावसाळ्यानंतर शहरातील 80 फुटी रस्त्याचे काम सुरु होईल अशी अपेक्षा आहे. यंदा जुन महिन्यात उशिराने पाऊस सुरु झाला असला तरीही शहरातील प्रत्येक ठिकाणी रस्त्याला खड्डे पडलेले आहेत. याचा वाहनचालकांपासून ते पदाचार्‍यांपर्यंत प्रत्येकाला त्रास सहन करावा लागत आहे.

मागील आठ दिवसांमध्ये मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. सतत पडणार्‍या पावसामुळे रत्नागिरी शहरातील डांबरी रस्त्यांची दुर्दशा झाली असून मारुती मंदिर, शिवाजीनगर या टप्प्यात अंतराअंतरावर खड्डे आहेत. ते चुकवून वाहने हाकण्याची वेळ चालकांवर आली आहे. शहरातील मुख्य बसस्थानकापासून खाली आठवडाबाजार, काँग्रेसभवन, मारुती आळी या परिसरात खड्डेच खड्डे आहेत. आठवडाबाजार ते काँग्रेसभवन या रस्त्यावर सहा महिन्यात चार वेळा दुरुस्ती झाली. पण पुन्हा खड्डे पडलेले आहेत. मुख्य रस्त्यावर तेली आळीमधून पुढे गेल्यानंतर आठवडा बाजारातील एक भला मोठा खड्डा हाडं खिळखिळी करुन टाकणारा आहे. कोकण नगर परिसरातही काही महिन्यांपुर्वी नव्याने रस्ता करण्यात आलेला आहे. तेथेही बिकट अवस्था असून डांबरातील बारीक खडी वर आल्यामुळे चाळण झाली आहे. त्यावरुन दुचाकी घसरण्याची भिती आहे. रहाटाघर येथे कायमस्वरुपी पाणी साचल्याने तिथे मोठा खड्डा तयार झाला आहे. याठिकाणी एसटीची नियमित वाहतूक सुरु असते. जयस्तंभकडून जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाजवळून जाणारा रस्ताही खड्ड्यांपासून चुकलेला नाही. रत्नागिरी शहरात खड्ड्यांमुळे नजर चुकी दुर्घटना घटी अशीच परिस्थिती आहे. पालिकेकडून खड्डे बुजवण्याची मोहिम हात घेतली होती. परंतु पावसाचा जोर पाहता हे खड्डे पुन्हा उखडले आहेत. खड्डे बुजवण्यासाठी पालिकेच्या फंडातून निधी खर्ची टाकण्यात येणार आहे. तर काही रस्त्यांवरील खड्डयांसाठी ठेकेदाराला सुचना देण्यात आल्या आहेत. सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पालिकेला खड्डे बुजवण्यासाठी कालावधी मिळणार आहे. त्यात पालिका रस्ते दुरुस्तीचे मोहिमी कशी राबवितात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

शहरातील रस्त्यांबाबत प्रशासनाकडून योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कामाचा दर्जा घसरला असून त्याकडे गांभिर्याने पाहिले पाहीजे. सध्या रस्त्यांची दुरवस्था पाहिली तर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेतली पाहीजे.

  • मिलिंद किर, माजी नगराध्यक्ष