रत्नागिरी शहरातील घरपट्टी थकवणाऱ्या 182 प्रॉपर्टी सील

रत्नागिरी नगर परिषदेची कारवाई ; 78 टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण 

रत्नागिरी:-मार्च एन्डपर्यंत घरपट्टी ठाकवणाऱ्यांना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला आहे. वारंवार नोटिसा बजावून देखील घरपट्टी थकवणाऱ्या शहरातील 182 मालमत्ता पालिकेने सील केल्या आहेत. त्यामध्ये मोबाईल टॉवर, मंगल कार्यालय, इमले आणि नॉन बॅंकिंग कंपन्यांच्या काही कार्यालयांचा समावेश आहे.  मार्चएन्ड अखेर 14 कोटी वसुलीपैकी 10 कोटी 90 लाख वसूल करण्यात रनपला यश आले आहे. 

रत्नागिरी नगर परिषदेची दरवर्षी सुमारे २८ हजार इमलेधारकांकडून सुमारे ७ कोटीची घरपट्टी वसुली होते; मात्र कोरोना काळामुळे घरपट्टी थकबाकी १४ कोटीवर गेली होती. यापूर्वी पालिकेने अनेक सवलती दिल्या होत्या; मात्र मार्च एन्ड जवळ येताच रनप प्रशासनाने घरपट्टी थकबाकीविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली. मार्च महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत केवळ ५५ टक्के थकबाकी वसूल झाली होती, उर्वरित साडेसहा कोटी रुपयांचे मोठे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान रनप समोर होते. थकीत घरपट्टी वसूल करण्यासाठी रनप कडून विशेष मोहीम आखण्यात आली. यात थकबाकीदार असलेल्या शासकीय कार्यालयांना रेडकार्ड देण्यात आली. 

शहरातील मालमत्ताधारकांना नोटिसा देऊनही त्यांनी घरपट्टी न भरल्याने पालिकेच्या वसुली पथकाने थकबाकीधारकांना झटका दिला आहे. मार्च अखेरीला शहरातील 182 मालमत्ता रनपने सील केल्या आहेत. त्यांच्याकडून लाखो रुपये येणे बाकी आहे. यामध्ये मोबाईल टॉवर, रनपचे भाडे तत्त्वावरील गाळे, खासगी गाळे यांचा समावेश आहे. मार्च अखेरीला 14 कोटीपैकी 10 कोटी 90 लाख वसुली पूर्ण झाली असून 100 वसुली होईपर्यंत कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे. मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली पथकाचे अधिकारी नरेश आखाडे, उत्तम पाटील, सागर सुर्वे, अभियंता शिवचर आदींचा समावेश आहे.