शील जॅकवेलमध्ये दोन नवे पंप
रत्नागिरी:- एका तासाला 3 लाख 70 हजार लिटर, असे 270 अश्वशक्तीचे दोन विद्युत पंप आज शीळ जॅकवेलमध्ये बसविण्यात आले. दोन्ही पंप तासाला 7 लाख 40 हजार लिटर पाणी खेचणार आहेत. त्यामुळे 24 तास नव्हे; तर अवघ्या 16 ते 18 तासात जलशुद्धीकरण केंद्राची टाकी फुल होणार आहे. पालिकेच्या महत्त्वाच्या निर्णयामुळे बुधवारपासून शहरवासीयांना मुबलक, स्वच्छ आणि पूर्ण दाबाने पाणी मिळेल, असा दावा नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी केला.
रत्नागिरी शहराला शीळ धरणातून पाणी पुरवठा होतो. या धरणाच्या पायथ्याशीच शीळ जॅकवेल आहे. तेथून दोन विद्युत पंपाद्वारे सुमारे 6 किमी अंतरावर असलेल्या साळवी स्टॉप येथे पाणी खेचून आणले जाते. साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्रातून ते प्रक्रिया करून शहरवासीयांना दिले जाते. दिवसाला शहराला 11 ते 12 एमएलडी पाणी वितरित करावे लागते. मात्र टाक्यांची लेव्हल होण्यासाठी 24 तास हे पंप सुरू ठेवावे लागता. तरी अपेक्षित पाणी साठा होत नाही. पाणी पुरवठ्यातील अनियमितेमुळे पालिकेच्या सत्ताधार्यांकडे बोट दाखविले जाते. मुलभुत प्रश्नावर नागरिक सत्ताधारी आणि प्रशासनाला धारेवर धरते. या नेहमीच्या कटकटीपासून सुटका मिळविण्यासाठी नगराध्यक्ष बंड्या साळवी, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन शीळ जॅकवेलमध्ये नवीन विद्युत पंप बसविण्याचा निर्णय घेतला. सुमारे 1 कोटी 75 लाख रुपये खर्च करून शीळ जॅकवेलची सुधारणा करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी 270 अश्वशक्तीचे तीन विद्युत पंप पालिकेने खरेदी केले आहे. गेली काही दिवस ते बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ते अंतिम टप्प्यात आले आहे. नवीन 2 पंप बसविण्यात आले असून एक अत्यावश्यक सेवेसाठी घेऊन ठेवला आहे.
नवीन विद्युत पंपाची ताकद मोठी असून त्याचा पाणी पुरवठ्यावर चांगला परिणाम होणार आहे. एक पंप 1 तासाला 3 लाख 70 हजार लिटर, पाणी खेचतो. असे दोन पंप शीळ जॅकवेलमध्ये बसविण्यात आले आहेत. तासाला ते 7 लाख 40 हजार लिटर पाणी खेचणार आहेत. त्यामुळे साळवी स्टॉप येथील मुख्य टाकी भरण्यासाठी जुने पंप 24 तास सुरू ठेवले तरी ते भरले जात नव्हते. मात्र नव्या पंपांद्वारे 16 ते 18 तासात जलशुद्धीकरण केंद्राची टाकी पूर्ण क्षमतेने भरणार आहे. पालिकेच्या महत्त्वाच्या निर्णयामुळे बुधवार (ता. 7) पासून शहरवासीयांना मुबलक, स्वच्छ आणि पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे.