रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात २ लाख ८९ हजार मतदार

प्रत्येक उमेदवाराला ४० लाखाच्या खर्चाची मर्यादा: जीवन देसाई

रत्नागिरी:- रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये २ लाख ८९ हजार ९६४ मतदार असून मतदान नोंदणीसाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. या मतदार संघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असून ८५ वर्षाहून अधिक वयाचे साडेआठ हजार मतदार असल्याची माहिती या मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले. प्रत्येक उमेदवाराला ४० लाखाच्या खर्चाची मर्यादा असून उमेदवारांच्या खर्चासह निवडणूक प्रक्रियेवर यंत्रणेचे विशेष लक्ष राहणार आहे.

बुधवारी दुपारी उपविभागीय कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेला सहा. निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम म्हात्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना देसाई यांनी सांगितले की, २२ ऑक्टोबर रोजी निवडणुकीबाबत नोटीफिकेशन जारी होणार आहे. रत्नागिरी मतदार संघात १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत २ लाख ८९ हजार ९६४ मतदार असून त्यात १ लाख ४१ हजार ५५६ पुरुष तर १ लाख ४८ हजार ३९७ महिला मतदार आहेत तर ११ तृतीय पंथीय मतदार असल्याचेही त्यांनी सांगितले. या मतदार संघात ४ हजार ४४० नवमतदार असून ते प्रथमच मतदान करणार आहेत तर ८० वर्षाहून अधिक वयाचे ८ हजार ५१९ मतदार आहेत. सर्वाधिक मतदार हे ४० ते ४९ वयोगटातील आहेत. ८५ वर्षाहून अधिक ३७१२ मतदार असून यात १४९५ पुरुष तर २२१७ महिला मतदार आहेत. मतदार संघात ११८५ दिव्यांग मतदार आहेत तर ४४ सर्व्हीस वोटर आहेत तर १३ अनिवासी भारतीय मतदार आहेत.

रत्नागिरी मतदार संघात ३५२ मतदान केंद्र आहेत. यामध्ये शहरात २९ ठिकाणी ६७ मतदान केंद्र तर ग्रामीण भागात २३६ ठिकाणी २८५ मतदान केंद्र आहेत. शहरामध्ये गोदूताई जांभेकर महिला विद्यालय हे मॉडेल पोलींग स्टेशन असणार आहे. सर्व महिला कर्मचारी असणारे मतदान केंद्र हे १८५ नंबर न.प. वॉर्डक्रमांक ४ व ६ मध्ये असणार आहे. दिव्यांग कर्मचारी असणारे मतदान केंद्र खेडशी येथे असून तरुण कर्मचारी असणारे केंद्र नाचणे येथे असणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मतदार संघासाठी ३६ झोनल अधिकारी असून ५ राखीव झोनल असे ४१ अधिकारी आहेत.

या मतदार संघात ९ फिरती भरारी पथके आहेत. ३ व्हिडीओ भरारी पथके असून मतदार संघात भाट्ये, गावखडी, हातखंबा, उक्शी, करबुडे फाटा व वाटद खंडाळा याठिकाणी पथके तैनात करण्यात येणार आहेत.प्रत्येक उमेदवाराला ४० लाख खर्च मर्यादा असून नॉमिनेशन भरल्यापासून हा खर्च मोजला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.