रत्नागिरी बाजारपेठेतील दुकाने शिवसेनेकडून बंद

रत्नागिरी:- शेतकरी कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी रत्नागिरी बाजारपेठेत उघडलेली दुकाने शिवसैनिकांनी बंद केली. माजी शहर प्रमुख प्रमोद शेरे, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, नगरसेवक निमेश नायर आदी शिवसैनिक बाजरपेठेतील दुकाने बंद करण्यासाठी फिरत आहेत. बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. 

केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी मंगळवार 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली. बळीराजाच्या या बंदला देशभरातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला असून महाराष्ट्रातही कडकडीत बंदला सुरुवात झाली आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर  कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे. यावेळी कांदा, मका, बटाटा आणि इतर शेतमालाचा लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे मंगळवारी रत्नागिरीत भाजीपाल्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. 

माथाडी कामगारही काम बंद ठेवून या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. तर शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा म्हणून सेना पुरस्कृत रिक्षा संघटना संपात उतरली आहे.