रत्नागिरी:- रत्नागिरी पंचायत समितीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्यात जिल्हा परिषद अध्यक्षांसहीत सर्वांनाच डावलण्यात आले. येथे राजशिष्टाचाराचा भंग झाला हे स्पष्ट आहे. शासकीय भूमीपूजन, उद्घाटन सोहळ्यावेळी राजशिष्टाचार पाळणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. जिल्हा परिषदेला डावलणाऱ्या गटविकास अधिकारी तुकाराम जाधव यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश सीईओंना देण्यात आले आहेत. तर संपूर्ण भूमीपूजन सोहळा नियोजन प्रक्रियेची चौकशी करण्याची जबाबदारी जि.प. उपाध्यक्ष उदय बने यांच्यावर सोपविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात रत्नागिरी पंचायत समितीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन होणार असल्याची तोंडी माहिती मला पंचायत समितीमार्फत देण्यात आली होती. भूमीपूजन सोहळ्यापूर्वी कार्यक्रमाची पत्रिका पाठविण्यात आली. त्या पत्रिकेवर राजशिष्टाचारानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निमंत्रित करणे व त्यांची नावे समाविष्ट करणे गरजेचे होते. पंचायत समिती ही जिल्हा परिषदेचे अंग आहे. त्यांचा कारभार जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत चालतो. त्यामुळे त्यांनी नियमाला धरून काम करणे अपेक्षित आहे.
भूमीपूजन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकाऱ्यांना डावलण्यात आले ही वस्तुस्थिती आहे. परंतु गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या एका निमंत्रण पत्रातही जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना समावेश नाही. अशी चूक अनावधनाने होणे शक्य नाही. एखाद्या व्यक्तीचे नाव राहू शकते. परंतु संस्थेच्या प्रमुखांच्या नावांचा विसर पडणे हा त्यांचा अवमान असतो. या सर्व प्रकाराला गटविकास अधिकारी जबाबदार असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तर या प्रकाराची चौकशी करण्याची जबाबदारी जि.प. उपाध्यक्ष उदय बने यांच्यावर देण्यात आली आहे. या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियमानुसार योग्य ती कडक कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा विक्रांत जाधव यांनी दिला आहे.