ना. सामंत; एक लाख नोकर्यासह उद्योग रिसर्च सेंटर, संशोधन विद्यापीठ, शाळा उभारणार
रत्नागिरी:- जिल्ह्यातील तरूणांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, प्रदूषणविरहीत प्रकल्पाच्या माध्यमातून औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी रत्नागिरी नवप्रवर्तन जिल्हा म्हणून राज्य सरकारने घोषीत केला आहे. उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला असून पुढील चार महिन्यात जिल्ह्याचा औद्योगिक आराखडा तयार केला जाईल. एक लाख नोकर्यासह उद्योग रिसर्च सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन विद्यापीठ, शाळा जिल्ह्यात उभारण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी जिल्हा निसर्ग साैंदर्याने नटलेला आहे. येथे प्रदूषणविरहीत कारखाने आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलली आहे. राज्यात प्रथमच रत्नागिरी जिल्हा नवप्रवर्तन जिल्हा म्हणून घोषीत करण्यात आला असून पुणे येथील प्रा.जगदाळे यांच्याकडे औद्योगिक विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आराखड्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर देशासह परदेशातील उद्योग जिल्ह्यात आणण्यात येणार आहे. एमआयडीसीतील ताब्यात जागा विकसीत करण्याबरोबरच शेतकर्याकडून जागा घेऊन तेथे उद्योग उभारले जातील.
जिल्ह्यात १०० देशातील २५०० वैज्ञानिक, संशोधक हे संशोधनासाठी येतील अशी व्यवस्था उभी केली जाणार आहे. या योजनेंतर्गत पर्यटन व्यवसायाला चालना दिली जाईल. टेक्नॉलॉजीवर आधारीत उद्योग आणण्यावर सरकार भर देणार आहे. यासाठी कारखान्यांना मार्गदर्शन करणारे अत्याधुनिक व सुसज्ज सेंटर येथे उभारले जाणार असल्याचे ना.सामंत यांनी सांगितले.
नवप्रवर्तन योजनेची अंमलबजावणी केवळ परदेशात झाली आहे. महाराष्ट्र प्रथमच ही योजना राबविली जात आहे. यासाठी उद्योग मंत्रालयाबरोबरच उच्च व तंत्रशिक्षण विभाग, पर्यटन खाते हे एकत्रितरित्या काम करणार आहेत. स्थानिक जनतेने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या प्रकल्पांना पाठिंबा देण्याची आवश्यकता असून जिल्ह्याच्या औद्योगिक क्रांतीचे नवे पाऊल महाविकास आघाडीच्या सरकारने टाकले असल्याचे ना.सामंत यांनी सांगितले.