भाजपसह गाव पॅनलची दणकेबाज कामगिरी
रत्नागिरी:- ग्रामपंचायत निवडणुकीत रत्नागिरी तालुक्यात गड राखण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. १४ ग्रामपंचायती रत्नागिरी तालुक्यात जिंकल्याचा दावा ठाकरे गटाने केला असून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ३३ पैकी १७ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. कोण जिंकणार? कोण पराभूत होणार? याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली होती. मात्र खरी लढत ही शिंदे विरूद्ध ठाकरे गटात झाल्याचे चित्र निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. या निकालात उद्धव ठाकरे गटाने १४ ग्रामपंचायतींवर दावा केला असून शिंदे गटाने रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ३३ पैकी १७ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.
तालुक्यातील टेंभ्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षणीय ठरली होती. या निवडणुकीत सरपंच पदासाठी शिंदे गटाच्या महिला आघाडी तालुकाध्यक्ष कांचन नागवेकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अटीतटीच्या लढतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अशोक नागवेकर यांनी ६०५ मते घेऊन कांचन नागवेकर यंाचा पराभव केला. त्यांना ३३७ मते मिळाली.
ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल धक्कादायक आले. या निवडणुकीत फणसवळे ग्रामपंचायतीत ठाकरे गटाने वर्चस्व मिळविले आहे. ठाकरे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार निलेश लोंढे यांनी ८४८ मते घेऊन दणदणीत विजय मिळविला तर त्यांचे प्रतिस्पर्धी रविंद्र पवार यांना ४८८ मते मिळाली.
मंगळवारी आलेल्या निकालाने अनेकांना धक्का बसला आहे. एकेकाळी भाजपचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळंगेत भाजपला धोबीपछाड मिळाला आहे. ही ग्रामपंचायत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने काबीज केली आहे. सरपंच पदाच्या निवडणुकीत नम्रता बिर्जे ५७५ मते घेऊन विजयी झाल्या तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शीला कदम या पराभूत झाल्या आहेत.
तालुक्यात सर्वाधिक लक्षवेधी निवडणूक वळके गावात झाली होती. वळके हे नाम. उदय सामंत यांचे होमपिच असल्याने या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे
साऱ्यांच्या नजरा लागून होत्या. अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाच्या उमेदवाराने प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडविला. सरपंच पदाच्या निवडणुकीत उत्तम सावंत
यांनी ३०७ मते घेऊन विजय मिळविला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी मुकुंद सावंत यांना २८३ मतांवर समाधान मानावे लागले.
साऱ्यांचे लक्ष गणेशगुळे ग्रा. पं. निवडणुकीकडे लागले होते. अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीत शिंदे गटाने दणदणीत विजय मिळविला आहे. सरपंच
पदाच्या निवडणुकीत श्रावणी रांगणकर यांनी ३३९ मते घेऊन दणदणीत विजय मिळविला आहे तर त्यांच्या प्रतिस्पर्धी संपदा गुरव यांना अवघी १०० मते
मिळाली आहेत.
तालुक्यातील गावडे आंबेरे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा वरचष्मा राहिला आहे. या निवडणुकीत लक्ष्मण सारंग यांनी ६१४ मते मिळवून सरपंच पदाला गवसणी घातली आहे तर त्यांचे प्रतिस्पर्धी बळीराम डोंगरे यांना अवघी ३८२ मते मिळाली आहेत.
सेनेचे एकहाती वर्चस्व असलेल्या धामणसे ग्रामपंचायतीत मोठे परिवर्तन झाले आहे. धामणसे हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र या निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का मिळाल आहे. भाजपने ही ग्रामपंचायत खेचून आणली आहे. या निवडणुकीत अमर रहाटे हे सरपंच पदी निवडून आले आहेत. रहाटे यांना ४४८ मते मिळाली.
केळ्ये ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाने बाजी मारली आहे. सौरभी पाचकुडे यांनी ५७३ मते घेऊन सरपंच पदाचा बहुमान पटकावला आहे. त्यांच्या
प्रतिस्पर्धी सायली नाखरेकर यांना ५१० मते मिळाली आहे. जांभारी ग्रामपंचायतीत आदेश पावरी हे सरपंच पदासाठी निवडून आले आहेत. पावरी यांना
३२३ मते मिळाली.
तालुक्यातील तरवळ व कासारवेली या दोन्ही ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाने वर्चस्व मिळवल्याचा दावा केला आहे. तरवळ ग्रामपंचायत सरपंचपदी ठाकरे गटाचे रमेश मालप हे ९१७ मते घेऊन विजयी झाले आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी संदेश माईंगडे यांना ४४४ मते मिळाली आहेत. कासारवेली
ग्रामपंचायत सरपंचपदी वेदिका बोरकर यांनी विजय संपादन केला. बोरकर यांना ७३८ तर त्यांच्या प्रतिर्स्धी अनुराधा सुवरे यांना ६४९ मते मिळाली.
तालुक्यातील चांदोर ग्रामपंचायत ही पुन्हा एकदा ठाकरे गटाकडे राहिली आहे. सरपंच पदाच्या उमेदवार पूनम मेस्त्री यांनी ७१५ मते घेऊन दणदणीत विजय
मिळविला तर त्यांच्या प्रतिस्पर्धी स्वाती तरळ यांना १७३ मते मिळाली.
चाफेरी ग्रामपंचायत निवडणूक ही रंगतदार बनली होती. या निवडणुकीत माजी जि. प. सदस्य बाबू पाटील यांच्या पॅनलचा आदित्यश्वर गावविकास पॅनलने धुव्वा उडवला आहे. सरपंच पदाच्या उमेदवार अंजली कांबळे यांनी दणदणीत विजय मिळविला आहे.
तालुक्यातील टिके व तोणदे ग्रामपंचायत निवडणुकीत गड अभेद्य राखण्यात ठाकरे गटाला यश आले आहे. टिकेच्या सरपंचपदी भिकाजी शिनगारे ७३९ मते घेऊन विजय संपादित केला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी गुरुदास गोविलकर यांना ४८५ मते मिळाली तर तोणदे सरपंचपदी शिला जाधव ५०३ मते घेऊन विजयी झाल्या आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी अंकिता जाधव यांना ३१७ मते मिळाली.
तालुक्यातील निवेंडी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने तर पिरंदवणे ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. निवेंडीच्या सरपंचपदी रविना कदम या निवडून आल्या आहेत. त्यांना ३८० तर प्रतिस्पर्धी दिपाली देसाई यांना ३४२ मते मिळाली आहेत. पिरंदवणे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे सरपंच
पदाचे उमेदवार श्रीकांत मांडवकर अवघ्या ३० मतांनी विजयी झाले आहेत. मांडवकर यांना ३८६ तर प्रतिस्पर्धी संजय लोखंडे यांना ३५६ मते मिळाली.
तालुक्यातील पूर्णगड, भगवतीनगर व मालगुंड या तिन्ही ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे गटाचा भगवा फडकला आहे. पूर्णगड सरपंचपदी सुहासिनी धानबा या ६७८ मते घेऊन विजयी झाल्या आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रकल्पा हरचकर यांना ६४२ मते मिळाली. भगवतीनगरमध्ये सरपंचपदी प्रगती भोसले ६६३ मतांनी निवडून आल्या. मालगुंडमध्ये श्वेता खेऊर ११६० मते घेऊन विजयी झाल्या आहेत.
त्यांच्या प्रतिस्पर्धी दुर्गा दुर्गवळी यांना १०५९ मते मिळाली. अवघ्या १०० मतांनी दुर्गवळी यांचा पराभव झाला.
तालुक्यातील विल्ये ग्रामपंचायतीत ग्रामस्थांनी गाव पॅनलची परंपरा कायम राखली आहे. या निवडणुकीत गाव पॅनलचे उमेदवार स्वप्नील देसाई २१४ मते घेऊन
सरपंचपदी निवडून आले आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी सुवेज कांबळे यांना अवघी ९५ मते मिळाली. तालुक्यातील वेतोशी व सत्कोंडी ग्रामपंचायतीत गाव पॅनलचे वर्चस्व राहिले आहे. वेतोशीच्या सरपंचपदी अरूण झोरे ४९० मतांनी निवडून आले आहेत. तर
सत्कोंडी ग्रामपंचायतीवरदेखील गाव पॅनलचे वर्चस्व राहिले आहे.
तालुक्यातील साठरे ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाने बाजी मारली आहे. सरपंच पदाच्या निवडणुकीत तृप्ती पेडणेकर ४२७ मते घेऊन विजयी झाल्या आहेत तर त्यांच्या प्रतिस्पर्धी ममता चव्हाण यांना २५४ मते मिळाली आहेत.
१४ ग्रा. पं. वर ठाकरे गटाचा दावा
मंगळवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीच्या निकालानंतर दावे, प्रतिदावे सुरू झाले आहेत. ठाकरे गटाने तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. त्यामध्ये कासारवेली, चांदोर, टिके, तोणदे, टेंभ्ये, तरवळ, पूर्णगड, फणसवळे, मालगुंड, भगवतीनगर, मावळंगे यासह बिनविरोध निवडून आलेल्या बोंडे, करबुडे, निरूळ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
शिंदे गटाने केला १७ ग्रा. पं. वर दावा
दावे, प्रतिदावे होत असतानाच शिंदे गटानेही रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात १७ ग्रामपंचायतींवर एकहाती वर्चस्व मिळविल्याचा दावा केला
आहे. ३३ पैकी १७ ग्रामपंचायती शिंदे गटाने मिळविल्याचे तालुकाप्रमुख महेश
उर्फ बाबू म्हाप यांनी जाहीर केले आहे.