रत्नागिरी तालुक्यात शरद पवारांचाच दबदबा

पक्षाची ताकद अत्यल्प; कार्यकर्ते अन्य पक्षाकडे वगळण्याची शक्यता

रत्नागिरी:- राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत सहभागी होत उपमुख्यमंत्री झाल्यानंतर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुक्यातील पदाधिकार्‍यांनी पक्षाचे नेते शरद पवार यांच्यासोबत राहण्याची भुमिका घेतली आहे. मात्र मतदारसंघातील पक्षाची ताकद पाहता असलेल्या कायकर्त्यांच्या फळीपुढे पक्ष कोणाकडे राहणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. या परिस्थितीचा फायदा अन्य पक्षांकडून उचलला जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन झाल्यानंतर 2004 ला रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांनी विजय मिळवन शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पक्षाचे स्थान मजबुत केले. त्यानंतर पक्षाची ताकद ग्रामीण भागात वाढविली; मात्र 2014 ला सामंत शिवसेनेत गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष सामंत यांच्या मागेच उभा राहीला. त्यामुळे पक्षाचे अस्तित्वच अडचणीत आले होत. कुमार शेट्ये, बशीर मुर्तूझा, राजन सुर्वे, सुदेश मयेकर यांच्यासारख्या मोजक्याच नेत्यांच्या जोरावर उरलेल्या कार्यकर्त्यांची फळी टिकवून ठेवली. या घडामोडीत पक्षाचे मोठे नुकसान झाले. सध्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भुमिका घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे; मात्र रत्नागिरी तालुक्यातील उरलेली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या फळी अजुनही शरद पवार यांच्याच पाठीशी उभी राहील अशी ग्वाही ज्येष्ठ नेत्यांकडून दिली जात आहे. तरीही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. रत्नागिरीतील जुने कार्यकर्ते हे शरद पवार यांच्या तालमीतील आहेत. अजितदादांनी पक्ष आणि चिन्ह आमच्याकडेच असल्याचा दावा केल्यामुळे कार्यकर्त्यांची फळी पुन्हा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा अन्य पक्षांना होऊ शकतो.


आमचा विश्‍वास पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर आहे. त्यामुळे भाजपसोबत गेलेल्या नेत्यांबरोबर आम्ही जाणार नाही. यासंदर्भात आम्ही सर्व तालुक्यातील पदाधिकारी एकत्र येऊन चर्चा करणार आहोत.

  • कुमार शेट्ये, नेते

राज्यातील अशा राजकीय घडामोडींची कुणकुण दोन महिन्यांपुर्वी लागली होती. तेव्हापासून आम्ही तशी मानसिक तयारी केली होती. तसेच भाजपसोबत जाणार्‍यांबरोबर आम्ही जाणार नाही, हे निश्‍चित केले होते.

  • मिलिंद कीर, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी