रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील भाटीमिऱ्या गावाचे सुपुत्र जितेंद्र भोळे यांची महाराष्ट्र विधानसभा सचिव (१) या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. श्री.भोळे हे विधिमंडळाच्या सचिव पदावर प्रभारी होते.
श्री. भोळे यांनी काही काळ रत्नागिरी जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय केला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील भाटीमिऱ्या गावाचे सुपुत्र जितेंद्र भोळे यांनी न्यायालयात व विधिमंडळ प्रशासनात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या असून, त्यांच्या कुशल नेतृत्वगुणांमुळे महाराष्ट्र विधानसभेच्या कार्यपद्धतीत नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत स्त्रीरोग तज्ञ शैलेंद्र भोळे व अस्थिरोग तज्ञ निलेंद्र भोळे यांचे धाकटे बंधू जितेंद्र भोळे यांची विधानसभा सचिव (एक) या पदावर नियुक्ती झाल्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनीही त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली विधिमंडळाचे कामकाज अधिक सक्षम आणि पारदर्शक होईल,असा विश्वास विधानभवनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
श्री. जितेंद्र भोळे यांना त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी अनेक मंत्र्यांनी, आमदारांनी, अधिकाऱ्यांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यापूर्वी जिल्ह्याचे सुपुत्र श्री भास्कर शेटे विधान सभा सचिव (१) या पदावरून निवृत्त झाले होते. रत्नागिरी जिल्ह्याला दुसर्यांदा विधानसभेचे सचिव पद मिळाले आहे.