रत्नागिरी जिल्हा बँकेच्या तज्ञ संचालकपदी रमेश कीर

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्याच्या सहकार क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या आणि सर्वसामान्य लोकांना आर्थिक सक्षम करण्यात सदैव पुढाकार घेणाऱ्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरीच्या तज्ञ संचालकपदी राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि रत्नागिरीचे सुपुत्र रमेश कीर यांची निवड झाली आहे.

 कायद्याचे पदवीधर असलेल्या रमेश कीर यांनी आजपर्यंत अनेक पदांवर कार्य केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून समाजकारणात आणि राजकारणात अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी कार्य केले. रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ते कॉग्रेसचे राज्य सरचिटणीस तसेच महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे संचालक, सभापती, कोकण म्हाडा(राज्यमंत्री दर्जा) अशी त्यांची दैदिप्यमान वाटचाल सर्वांच्या लक्षात राहणारी आहे. त्यासोबतच रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान लक्षणीय आहे. त्यांच्या याच विविध क्षेत्रातील अनुभवाचा आणि योगदानाची दखल घेत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या प्रमुख विश्वस्तपदी निवड करण्यात आली. 

 राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून अनेक परिषदा, मेळावे, कार्यशाळा यामधून त्यांनी अनेकदा सहकार, कृषी व इतर विषयावर मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत, खासदार विनायक राऊत, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, दिपक पटवर्धन यांच्यासह संचालक मंडळांनी अभिनंदन केले आहे. रमेश कीर यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे