चिपळूण:- चिपळूणमध्ये एका महिलेला ९० हजारांचे कर्ज दिल्यानंतर तब्बल साडेचार लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. या प्रकरणी महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणानंतर अनेकजण अवैध सावकारीविरोधात उघड बोलू लागले आहेत. लवकरच अन्य काही लोकही अवैध सावकारीविरोधात तक्रारी देण्याच्या तयारीत आहेत.
रत्नागिरी पोलिसांनी या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढायला सुरुवात केली आहे. रत्नागिरीत सावकारांची संख्या अधिक असली तरी चिपळूण, खेडमध्ये सावकारीने बस्तान बसवले आहे. पोलिसांचे लक्ष आता चिपळूण आणि खेड तालुक्यावर आहे. चिपळुणातही सावकारीच्या पाशात अडकून अनेकजण देशोधडीला लागले आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर ही सावकारी मोडीत काढण्याचे एक आव्हान उभे राहिले आहे. सावकारांकडे येणारा हा पैसा नक्की कोठून येतो, याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
सावकारी पाशात अनेकजण अडकले असून, सावकारीचे हे जाळे जिल्हाभर पसरले आहे. कर्जबाजारी झालेल्यापैकी काहींनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रत्नागिरीपाठोपाठ चिपळूणमध्येही सावकारीला पेव फुटला आहे. काही बड्या सावकारांकडून लुटमार होत असल्याची चर्चा नाक्यानाक्यावर होत आहे. गेल्या काही वर्षांत रत्नागिरीत सावकारीचा धंदा तेजीत सुरू झाला आहे. अनधिकृतरीत्या सावकारी करून दामदुप्पट दराने व्याजाची वसुली केली जात आहे. एकदा सावकाराकडून कर्ज घेतल्यानंतर तो कर्जदार कर्जाच्या डोहात बुडून जात आहे. प्रत्यक्षात कर्जाची रक्कम एक आणि बॉण्डवर दुसरीच रक्कम लिहिली जात असल्यामुळे कर्ज घेतानाच कर्जदार फसत आहे. त्याशिवाय कर्जाचा हप्ता थकल्यानंतर दामदुप्पट दंडाची वसुली केली जात आहे. या सर्व प्रकारांमुळे कर्जदार देशोधडीला लागला आहे.