रत्नागिरीत लॉजीस्टीक पार्कच्या बरोबरीने मँगो पार्क, मरीन पार्कसह कॅश्यू पार्क उभारणार: ना. सामंत

रत्नागिरी:- कोकणातील आंबा, काजू, मासळी जेएनपीटी ऐवजी जयगड येथील बंदरातून परदेशात पाठवण्यासाठी रत्नागिरीत लॉजीस्टीक पार्कच्या बरोबरीने मँगो पार्क, मरीन पार्क आणि कॅश्यू पार्क उभारण्यासाठी उद्योग खात्याने तत्वतः मान्यता दिली आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील रत्नागिरीचा राजा मंडळाच्या मंडपामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राहूल पंडित, बिपिन बंदरकर, राजन शेट्ये, निमेश नायर, दिपक पवार, अभिजित गोडबोल आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये राज्यातील अन्य पाच जिल्ह्यांबरोबर रत्नागिरीत लॉजीस्टिक व कंटेनर पार्क उभारण्यास मान्यता मिळाली आहे. त्याला आवश्यक जागा एमआयडीसीमध्ये उपलब्ध करुन दिली जाईल. त्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळणार आहे. तसेच कोकणातील आंबा, काजू, मासळी जेएनपीटी बंदरातून परदेशात पाठविले जातात. रत्नागिरी तालुक्यात जयगड येथे जिंदल, आंग्रे पोर्टसह तिन मोठी बंदरे एकाच परिसरात आहेत. त्यांचा उपयोग करुन आंबा, काजू, मासळी परदेशात पाठविणे शक्य आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील उसाची मळीही जयगडमधील या बंदरातून पाठविली जाते. या सर्वांसाठी आवश्यक जागा जयगड परिसरात उपलब्ध करुन दिली जाईल. त्याचबरोबर वाटद-खंडाळा येथील शेतकर्‍यांशी चर्चा करुन कातळावरील पडीक जमीनीचा उपयोग करुन प्रदुषणविरहीत कारखाना आणण्याचा विचार आहे; परंतु जागा निवडताना लोकवस्ती, मंदिरे, मशिद किंवा अन्य कोणतीही वास्तू तिथे नसेल याची खात्री केली जाईल. उद्यमनगर (रत्नागिरी) येथील स्टरलाईटच्या जागेसंदर्भात अनिल अगरवाल यांच्याशी चर्चा सुरु आहे. हा प्रश्‍न न्यायालयीनस्तरावर आहे. तेथे कोणताही उद्योग आणला जाऊ शकतो. कोकणातील मुलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी काम सुरु असून लोटे, देवरुख, रत्नागिरीतील आजारी उद्योगांना बँकांचे अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्याचा अहवाल मागवला आहे. उद्योगांचा विस्तार आणि नवीन येऊ घातलेले उद्योग याबाबत लवकरच निर्णय घेतले जाणार आहेत. लांजा, राजापूर येथे मिनी एमआयडीसी सुरु करण्याचाही विचार आहे.
महाविकास आघाडीच्या कालावधीत नवीन उद्योजक घडविण्यासाठी ६३ कोटी रुपयांची तरतुद केली होती. त्यामधून २५०० लोकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार होते; मात्र शिंदे-फडणवीस सरकारने प्रोत्साहनपर निधीत वाढ करुन तो ५५० कोटी रुपये केला आहे. यामधून राज्यातील २५ हजार तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल. यामधून ७५ हजार नवीन रोजगार निर्माण होणार आहे. या योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्याला ८५० चे लक्ष आहे. गणेशोत्सवानंतर ते लक्ष डिसेंबरपर्यंत पुर्ण करण्याच्या सुचना संबंधित विभागाला दिल्या आहेत, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

बारसू येथील रिफायनरीविषयी आमदार राजन साळवी यांच्याशी चर्चा झालेली आहे. हा प्रकल्प आणण्यासाठी आवश्यक पाच हजार एकर पैकी तीन हजार एकर जागा उपलब्ध आहे. उर्वरित जागाही मिळू शकते. त्यामुळे देवाचेगोठणे, सोलगाव येथील एकही गुंठा जागा प्रकल्पासाठी घेण्यात आलेली नाही. मात्र ती गावे वगळण्याविषयी निर्णय झालेला नाही, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. ते म्हणाले, आमदार साळवी हे प्रकल्पाच्या बाजूने आहेत. खासदारांची भुमिका काय हा त्यांचा प्रश्‍न आहे; परंतु आमदार गावागावात फिरत असल्यामुळे निवडणुकीत खासदारांना मते मिळतात. कोकणातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी रिफायनरी यावी असा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने पावलेही उचलण्यात येत आहेत. यासंदर्भात गणपतीसमोर कुणी काय गार्‍हाणे घालावे हे आम्ही सांगणार नाही. प्रकल्प आणण्यासाठी वाटोळे होवो असे म्हणणे सोपे असते. पण प्रत्यक्षात रोजगार नसल्यामुळे जी परिस्थिती ओढवत आहे. याचाही विचार करणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन रोजगारासाठी प्रकल्प आणला जाणार आहे.

राज्यात आम्ही शिंदे सेना म्हणुन नव्हे तर शिवसेना म्हणून काम करत आहोत. शिवसेना-भाजप यांच्यामध्ये समन्वय असून चांगले काम सुरु आहे. जिल्हा नियोजनमधील अत्यावश्यक कामांसाठीचा निधी खर्च करण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे स्थगितीमुळे कोणतीही महत्त्वाची कामे थांबणार नाहीत असा विश्‍वास मंत्री सामंत यांनी व्यक्त केला.